मुंबई : दिल्लीतील संसद भवनाजवळील मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्या खासदारांसोबत बैठक घेतल्याचे समोर आले. या प्रकरणावरून त्यांच्याविरोधात बऱ्याच टीका झाल्या. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी अखिलेश यादव यांची वागणूक लज्जास्पद असल्याचे सांगत चांगलेच फटकारले आहे. रझवी यांनी संपूर्ण समुदायाची माफी मागण्यास सांगितले असून कसे न केल्यास मुस्लिम संघटना त्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.
मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले, "कुठल्याही मशिदीत राजकारण करता येणार नाही. अखिलेश यादव यांनी राजकीय बैठक घेऊन मोठा गुन्हा केला आहे. मशिदीला राजकारणाचा अखाडा बनवणाऱ्या अखिलेश यादव यांनी संपूर्ण समुदायाची माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर बैठकीला परवानगी देणाऱ्या रामपूरचे खासदार मौलाना मोहिबुल्लाह नदवी यांनाही समिती सदस्यांनी बडतर्फ करावे. त्यांचे कृत्य मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन करण्याचे आणि तिची पवित्रता नष्ट करण्याचे कृत्य आहे.