लँडिग करताना रशियन विमानाचा अपघात! ५० प्रवाशांच्या मृत्यूची भीती

24 Jul 2025 15:12:16

मॉस्को : (Russian Plane Crash) चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील भागात ५० जणांना घेऊन जाणारे अँटोनोव्ह An-24 हे प्रवासी विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे. हे विमान सोव्हिएत काळातील होते आणि जवळजवळ ५० वर्षे जुने होते. त्याच्या टेल क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले होते असे दिसून येत आहे.

विमानाचा उड्डाणादरम्यानच विमान वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच बचाव पथकांना घटनास्थळी विमानाच्या जळालेल्या अवशेषांचे काही भाग आढळून आले. स्थानिक आपत्कालीन सेवा मंत्रालयाच्या माहितीनुसार, अंगारा एअरलाइन्सचे An-24 हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ पोहोचत असतानाच मध्यंतरी त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आणि त्यानंतर रडारवरुन ते बेपत्ता झाले.

विमानतळापासून सुमारे १५ किमी अंतरावर जंगलात विमानाचे जळालेले अवशेष आढळले. या विमानात ५० प्रवासी होते, आणि त्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचाव पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. प्राथमिक तपासानुसार, कमी दृश्यमानतेमुळे लँडिग करताना पायलटची चूक झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0