मागील लेखात इच्छामरण व त्यामागील मानसिक प्रक्रियेचे कारण आपण पाहिले. कित्येकांनी असली उदाहरणे ऐकली असतील वा प्रत्यक्ष पाहिलीसुद्धा असतील. सुदैवाने हल्ली प्रसारमाध्यमांतून यांपैकी काही गोष्टी प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे या गोष्टींची आपल्याला माहिती होते व ज्ञानाच्या या महान कक्षा रुंदावत आहेत.
जड शरीराचा चालक लिंगदेह
गत शतकात पुण्यात एक महान योगी पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव नृसिंहसरस्वती महाराज होय. हे कोठून आले आणि कोठे निघून गेले, याबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. त्यांचे लेले नावाचे एक शिष्य होते. नृसिंहसरस्वती महाराजांनी लेले यांना आपल्या जडशरीराबाहेर निघून, कोठेही क्षणार्धात लिंगदेहाने जाण्याची किमया शिकविली होती. ती सिद्धी प्राप्त झाल्यावर, लेले यांनी आपल्या गुरूंना त्यावेळी चालू असलेल्या पहिल्या अफगाण युद्धाच्या भूमीत जाऊन प्रत्यक्ष आपल्या लिंगदेहाने पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. गुरूंनी त्याकामी त्यांना साहाय्य केले. त्यावेळी युद्ध पेशावर पलीकडील सरहद्द प्रांतात सुरु होते. लेले यांनी आपले जडशरीर पुण्यातील आपल्या घरी ठेवून, ते लिंगदेहाने क्षणार्धात सरहद्द प्रांतातील युद्धभूमीवर गेले. एकीकडून पठाण तर दुसरीकडून इंग्रज सैनिक गोळीबार करीत होते. ते युद्ध व्यवस्थित पाहता यावे, म्हणून लेले यांनी आपला लिंगदेह एका झाडाआड केला. वास्तविक लिंगदेह हवेपेक्षाही अतिसूक्ष्म असल्यामुळे, बंदुकीच्या गोळ्यांचा त्यांच्या त्या देहावर काहीच परिणाम झाला नसता. परंतु प्रथमच अनुभव असल्यामुळे, त्याही मायातीत अवस्थेत त्यांचा शरीरभाव पूर्णतया नष्ट झाला नसावा, म्हणूनच त्यांनी लिंगदेहाला झाडाआड लपवून युद्ध पाहण्याचे ठरविले. अधिक व्यवस्थितपणे पाहता यावे, म्हणून त्यांनी आपली मान झाडाआडून थोडी पुढे आणली. तो एक गोळी सूं सूं करीत त्यांच्या डोक्याच्या दिशेने येत असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी डोके एकदम मागील बाजूस झाडाचे दिशेने सारले. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाच्या डोक्याला मात्र बुंधा लागला असे त्यांना वाटले. लिंगदेहाच्या डोक्याला जड झाडाचा मार कसा व काय लागणार? पण आश्चर्याची गोष्ट अशी की, जडदेहाची त्यांची भावना त्याही सूक्ष्म अवस्थेत कायम असल्यामुळे ते युद्ध पाहण्याचे समाधान झाल्यानंतर, आपले सूक्ष्मशरीर घेऊन जेव्हा पुण्यातील जडशरीरात पुन्हा प्रवेश करते झाले, त्यावेळी उठून बसल्यावर त्यांना असे आढळून आले की, त्यांच्या जडदेहाच्या डोक्याला एक मोठे टेंगूळ आले आहे. मार सूक्ष्मशरीराला, पण टेंगूळ मात्र जडशरीराला आले. वास्तविक, जडशरीर युद्धभूमीवर नसून पुण्यालाच होते.
यावरून हे स्पष्ट आहे की, जडशरीराचा व्यवहार जडशरीराच्या आत वसणार्या, परंतु त्यापेक्षा स्वतंत्र असणार्या अशा एका स्वतंत्र अस्तित्वाच्या स्वाधीन असतो. त्या स्वतंत्र अस्तित्वाला ‘जीवात्मा’ असे म्हणतात. जडशरीराचे पतन झाल्यावर उर्वरित सूक्ष्म-सूक्ष्मेतर अशा तीन देहांना घेऊन, जीवात्मा अतींद्रिय यात्रेकरिता प्रस्थान करतो. या प्रस्थान करणार्या जीवात्म्याला मरणोत्तर दशेत ‘प्रेत’ असे म्हणतात. ‘प्र’ म्हणजे समोर व ‘एत’ म्हणजे कंपन करीत जाणे वा स्पंदन करणे. प्रेतांना ज्यावेळी मायेमुळे आसक्ती उत्पन्न होऊन ते मृत्यूनंतरसुद्धा जडव्यवहारात आसक्त राहतात, त्यावेळी त्यांना ‘पिशाच्च’ असे म्हणतात. आसक्तीमुळे प्रेत पिशाच्च बनते. असल्या अधमगतीस प्राप्त झालेल्या जीवांना, मरणोत्तर जीवनात सद्गती देण्याकरिता श्राद्धादि कर्मे सांगितली आहेत. श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध! मनाच्या शक्तीने मृत जीवात्म्यास नक्कीच गती मिळू शकते. श्राद्धकर्मात अतींद्रिय शास्त्रांचा आधार असल्यामुळे, साधना केल्याशिवाय त्यातील रहस्य साधारण जन जाणू शकत नाहीत.
अवकाश यान आणि श्राद्ध कर्म नवीन पिढीचा श्राद्धादिक कर्मावरील विश्वास उडत चालला आहे. याचे कारण म्हणजे जडशरीर समाप्त झाल्यावर कोणते अस्तित्व आहे, याची त्यांना कल्पना नसते, विश्वास नसतो. त्यामुळे श्राद्धादि कर्मे करणे व्यर्थ होय, असे त्यांचे प्रामाणिक मत असते. अवकाशयानाला चालविण्याकरिता पृथ्वीस्थित प्रयोगशाळेतून इलेक्ट्रॉनिक्सचा अतिसूक्ष्म न दिसणारा व्यवहार सांभाळून, ती अंतराळस्थित अवकाशयाने नियंत्रित केली जातात. तद्वत् श्रद्धेने जे कर्म केले, त्याचा परिणाम अवकाशस्थित प्रेतात्म्यावर होऊन त्याला सद्गती मिळू शकते. श्राद्धादि सूक्ष्म गतीची कर्मे व्यावहारिक तर्कवाद चालवून समजणे कठीण असते. त्या दिव्य प्रांतात प्रत्यक्ष अनुभव हवेत, अन्यथा तर्काने आपण सत्याला दूर सारून विपरीत व्यवहार करू शकतो.
ख्रिश्चन आणि मुसलमान संप्रदायात पुनर्जन्म मानत नाहीत. मृतात्म्यांची कलेवरे जमिनीत पुरून, एक हजार वर्षांनंतर होणार्या न्यायदिनाची त्या मृत कलेवराला ते वाट पाहायला लावतात. योगसाधनेचे अनुभव नसल्याने, हे कल्पनेचे व्यर्थ अशास्त्रीय व्यवहार आहेत. पुनर्जन्मावर विपुल संशोधने झाली आहेत व अजूनही होत आहेत. पुनर्जन्माचा सिद्धांत पटल्यामुळे मृत शरीराला अग्निसंस्कार करण्याच्या परंपरेबद्दल विचार करणार्या लोकात इतकी जागृती झाली आहे की, पाश्चात्य राष्ट्रांत आता मृत्यूनंतर शव जाळण्याची वृत्ती अधिक वाढत आहे. शास्त्रीय परंपरेचा हा वैज्ञानिक परिपाक आहे. श्राद्धकर्माबद्दलसुद्धा आज ना उद्या वैज्ञानिक पद्धतीने विचार करणार्यांना महती पटून, जगातील सर्व जाणकार लोक मृत व्यक्तीचे श्राद्धकर्म केल्याविना राहणार नाहीत, याबद्दल लेखकाला खात्री आहे.
आज जगातील बरेचसे धर्म व संप्रदाय केवळ विश्वासावर (षरळींह) आधारित आहेत. एखादा धर्मगुरू येतो, तो आपली शिष्य मंडळी या ना त्या रुपाने जमवतो आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तिगत कल्पना सांगतो. त्या व्यक्तिगत कल्पना त्यांच्या शिष्यपरंपरेने बिनबोभाट मानल्याच पाहिजे, त्या तशा न मानल्यास तो काफीर वा धर्माचा शत्रू असा त्यांचा समज असतो. मग त्या कल्पना अशास्त्रीय आणि अवास्तव असल्या तरी चालतील. वैदिक परंपरा ज्ञानमय असल्यामुळे, त्यात अशास्त्रीय आणि एकाच व्यक्तीच्या अवास्तव आग्रहाला प्राधान्य नाही. वैदिक परंपरेचा उद्गाता कोणताही एक पुरुष नसून, सत्याकरिता वैज्ञानिक पद्धतीने आपले सर्वस्व जीवन अर्पण करून अनेक ऋषींनी अतींद्रिय साधनांद्वारे सत्यांचा मागोवा घेतला आहे. असल्या सत्य ज्ञानाची शास्त्रीय मांडणी व उभारणी म्हणजे वैदिक परंपरा होय. म्हणून आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या युगातसुद्धा, वैदिक परंपरेतील व्यवहार व तत्त्वज्ञानविषयक सिद्धांत मान्य होत आहेत. याचे कारण वैदिक परंपरेत कोण्या एका व्यक्तीची वा ग्रंथाची अशास्त्रीय मिरासदारी नसून, अनेकांद्वारे प्राप्त व प्रसिद्ध झालेल्या ज्ञानाची मानवीय समाजाकरिता केलेली सत्य जोपासना होय.
योगराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357