मंत्रमातृका पुष्पमाला स्तोत्रातील हे तृतीय पुष्प देवीच्या षोडशोपचार पूजेतील तृतीय उपचार आहे. यापूर्वीच्या तीन श्लोकांत आपण देवीच्या सिंहासनाची, तिच्या पाद्यपूजनाची आणि अर्घ्यअर्पणाची कल्पना केली आहे. आता या मानसपूजेतील तृतीय उपचार अर्थात देवीच्या स्वरूपाला पवित्र स्नान घालत असल्याची, मानसिक अर्पणा करत आहोत. या श्लोकाची सुरुवात पंचदशी मंत्राचे चौथे बीज ‘ल’ने होते. पहिल्या तीन श्लोकांमध्ये अनुक्रमे ‘क’, ‘ए’, ‘ई’ या बीजांचा उल्लेख आहे.
श्लोक क्रमांक 4
लक्ष्ये योगिजनस्यरक्षितजगज्जाले विशालेक्षणे
प्रालेयाम्बुपटीर कुङ्कुमलसत्कर्पूरमिश्रोदकैः।
गोक्षीरैरपि नारिकेलसलिलैः शुद्धोदकैर्मन्त्रितैः
स्नानं देवि धिया मयैतदखिलं सन्तुष्टये कल्पताम्॥
आचार्य म्हणतात, हे जगन्माते! तूच समस्त योगिजनांचे लक्ष्य आहेस. तुझ्या स्वरूपाला साकल्याने जाणून घेण्यासाठीच योगिजन झटत असतात. शिवाशी सातत्याने तादात्म्य पावलेल्या तुला प्राप्त करून घेणे आणि तुझे सान्निध्य प्राप्त करणे, हाच शिवाजवळ जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्री ललिता सहस्त्रनामात देवीला शिवज्ञान प्रदायिनी असे म्हटले आहे. तीच शिवाचे ज्ञान देते. तिची अनुभूती झाल्याशिवाय, शिवाची अनुभूती अशक्य आहे. मोक्ष फक्त शिवच प्रदान करू शकतो आणि शिवाच्या दिशेने घेऊन जाण्याचे सामर्थ्य केवळ पराशक्तीकडेच आहे.
आई, तुला परम भक्तियुक्त अंतःकरणाने स्नान घालत आहे. तुझ्या स्नानासाठी केवळ साध्या जलाचीच योजना केली नसून, गंगाजल, गुलाबाच्या पाणी, चंदनाचे सुगंधित जल, केशरयुक्त जल, उत्तम कर्पूर सुगंधित जल, गोदुग्ध, शहाळ्याच्या जलाने आणि श्री सूक्त, पावमान सूक्त आणि रुद्राध्याय अशा मंगल सुक्तांचे पठण करून, त्या मंत्रसामर्थ्याने अभिमंत्रित जलाने मी तुला स्नान घालत आहे. या सर्व वस्तू सुगंधित आणि शीतल आहेत. हे आदिमाये! तू शिवाची शक्ती आहेस आणि शिव म्हणजे स्वतः कालाग्नि, अर्थात हजारो सूर्यांपेक्षा अधिक उष्ण तेजाने प्रज्वलित असलेले आहेत. त्यामुळे तुला प्रत्यक्ष भेटून स्नानसेवा तुझ्या चरणी अर्पण करणे, मला शक्यच नाही. परंतु ही मानसपूजा तू गोड मानून घे, हीच माझी विनंती.
श्लोक क्रमांक 5
ह्रींकाराङ्कितमन्त्रलक्षिततनो हेमाचलात्संचितैः
रत्नौरुज्ज्वलमुत्तरीयसहितं कौसुम्भवर्णांशुकम्।
मुक्तासंततियज्ञसूत्रममलं सौवर्णतन्तूद्भवं
दत्तं देवि धिया मयैतदखिलं संतुष्टये कल्पताम्॥
आचार्य म्हणतात, हे देवी! तुझे शरीर ‘ह्रीं’ या दिव्य बीजमंत्राने बनलेले आहे. मी मेरू पर्वतावरून झळाळते, तेजस्वी रत्न आणली आहेत. या रत्नांना केशरासारख्या कुशुंभ वर्णाच्या (ताम्रवर्ण) अंगवस्त्रावर जडवले आहे. यांसह मी शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या, नित्य मोत्यांनी लिप्त यज्ञोपविताच्या अर्थात जानव्यांच्या माळासुद्धा समर्पित करत आहे. हे सर्व मी केवळ तुझ्या आनंदासाठी, माझ्या अंतःकरणातून परम श्रद्धेने अर्पण करत आहे, कृपया याचा स्वीकार कर.
या श्लोकात आचार्य परात्पर शक्ती देवीसमोर पूर्ण समर्पण भावनेने आपली अंतर्मनातील पूजा साकारत आहेत. निखळ भक्तिभावाने देवीला प्रसन्न, आनंदी करण्यासाठी तिच्या चरणी रत्न आणि वस्त्रे अर्पण केली आहेत. ही भक्तीची परम अवस्था आहे आणि जगन्मातेबद्दलच्या विशुद्ध प्रीतीतूनच ही मानसपूजा साकारली आहे.
आई, मी तुझ्यासाठी मेरू पर्वतावरून रत्ने आणली आहेत असे म्हणताना, आचार्य प्रत्यक्ष मेरू पर्वतावर न जाता मनातच मेरू पर्वताची यात्रा करून, तिथून उत्कृष्ट अशी रत्ने वेचून देवीसाठी घेऊन येतात. बाह्य वस्तूंना मर्यादा आहेत, पण मन हेच सर्वांत सामर्थ्यशाली साधन आहे. त्याच्या माध्यमातूनच ब्रह्माची अनुभूती होऊ शकते.
या श्लोकात देवीच्या वस्त्रांचा वर्णन करताना कुशुंभवर्ण हा शब्द आलेला आहे. हा वर्ण केशरासारखा लालसर-केशरी असतो. देवीचे संपूर्ण स्वरूप हे रक्तवर्णी किंवा रक्तवर्णाच्या भिन्न भिन्न छटांनी व्यापलेले आहे. कारण लाल रंग हा करूणा, शक्ती आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. ललिता सहस्त्रनामाच्या ध्यान श्लोकांत, देवीच्या प्रत्येक देहाच्या स्वरूपाला हा लाल रंगच दिलेला आहे.
शिव हे पारदर्शक स्फटिकवर्ण युक्त आहेत. देवी त्यांच्या वामांगी आसनस्थ आणि तिचा रक्तवर्ण शिवात परावर्तित होतो. दोघे मिळून एकत्र स्वरुपात उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आणि अरुणवर्णी भासतात. शिव आणि शक्तीचे समन्वय स्वरूप ऐक्य रूप अत्यंत मोहक आहे. ‘ह्रीं’कार हे शिवशक्तीचे ऐक्य रूप मानले जाते. त्यामुळे या बिजाचे वर्णन करताना, शिवशक्ती सामरस्याचे वर्णन केले जाते.
या श्लोकात यज्ञोपवित या पवित्र सूत्राचा उल्लेख केला आहे. हे साधारणतः यज्ञापूर्वी घालण्यात येणारे सूत्र आहे. यज्ञोपवित धारण करण्यासाठी, उपनयन संस्कार केला जातो. त्यानंतर गायत्री मंत्रदीक्षा दिली जाते आणि तुम्हाला पूरोहित यज्ञोपवित घालतात. हे धारण करणे म्हणजेच, यज्ञाचा अधिकार प्राप्त करणे आहे. यज्ञोपवित अर्थात जानव्याचे तीन धागे ब्रह्मा, विष्णु आणि शिव या त्रिमूर्तीचे प्रतीक आहेत. हे धारण करणारा यज्ञकर्ता शुद्ध असतो आणि तो यज्ञ करण्यास पात्र आहे ,असे मानले जाते.
पण येथे साधक जेव्हा देवीला हे अर्पण करतो तेव्हा तो जाणून आहे की, यामुळे तिच्या शुद्धतेत काही बदल होणार नाही. कारण ती स्वयंपवित्र, परमपवित्र आहे. तरीही तो अर्पण करत आहे, कारण ही केवळ नियमित भक्ती नव्हे, तर प्रेमाने ओथंबलेली भक्ती आहे. प्रेम हे भक्तीच्या सर्वोच्च पायर्यांपैकी एक असते, जिथे साधक देवीला उच्च आसनावर न ठेवता आपल्यासमोर आपल्या सन्मुख ठेवत आहे.
मेरू पर्वत हे देवीचे निवासस्थान आहे. ललिता सहस्त्रनामात ती ‘मेरूनिलया’ म्हणून ओळखली जाते. श्री चक्राच्या मध्यभागी असलेला बिंदू म्हणजेच मेरू पर्वताचे सूक्ष्म आणि पवित्र रूप आहे. श्रीचक्राचे त्रिमितीय रूप महामेरू म्हणून ओळखले जाते. मेरूचा आणखी एक अर्थ म्हणजे ती पंचदशी मंत्राची संक्षिप्त रचना आहे. या मंत्रात 15 बीजाक्षर असले, तरी जर पुनरावृत्ती वगळली तर नऊ बीजे उरतात - ‘क’, ‘ए’, ‘ई’, ‘ल’, ‘स’, ‘ह’, ‘र’, ‘म’ आणि बिंदू. मेरू म्हणजेच कुंडलिनी शक्तीचा मेरूदंडातून होणारा प्रवास.
या श्लोकात ’ह्रींकाराङ्कितमन्त्रलक्षिततनु’ असे म्हटले आहे. म्हणजेच देवीचे शरीर ’ह्रीं’ या बीजमंत्राचे साक्षात स्वरूप आहे. ललिता सहस्त्रनामातही तिला ह्रींकारी म्हटले आहे. ‘ह्रीं’ या बीजाचा विग्रह म्हणजे, ह + र + ई + म + बिंदू. ‘ह’ म्हणजे प्रकटीकरण, ‘र’ म्हणजे आच्छादन, ‘ई’ म्हणजे परिपूर्णता आणि मकार रुपी बिंदू या तिन्हींवर नियंत्रण ठेवतो. अर्थात ‘ह्रीं’ हे मायाबीज वास्तवात शिवशक्ती ऐक्यरूपाचे शब्दात्मक प्रकटीकरण आहे. भौतिक पातळीवर शिवशक्तैक्यरूप जसे दिसेल, तसा हे अक्षर दिसते. या बीजाचा उल्लेख माया बीज असा केला जातो कारण, हे बीज परमब्रह्म तत्त्वावर आच्छादन स्वरूप आहे. जोपर्यंत हे मायपटल भेदण्यात जीवात्म्याला यश येत नाही, तोपर्यंत तो परमब्रह्म तत्त्वाला जाणून घेऊ शकत नाही.
‘ह्रीं’ या बीजाचा विग्रह ह + र + ईं असासुद्धा केला जाऊ शकतो. यातील हकार हा शिव तत्त्वाचे बीज आहे आणि ‘ईं’कार हे कामकला बीज आहे. अर्थात शक्तिबीज आहे. रकार या शिव आणि शक्तिबीजाचे ऐक्य घडवतो. रकार या दोन बिजांचे एकत्रीकरण करून, शिवशक्ती अर्थात मायाबीज निर्माण करतो. ‘ह्रीं’ हे बीज शांतता आणि पावित्र्य, मांगल्यनिदर्शक आहे. शिवशक्ती ऐक्य हे क्षुब्ध चित्ताला शांत करणारे असते. ‘ह्रीं’ बीज तेच कार्य करते.
‘ह्रीं’ हा मंत्र शिवशक्तीचे अद्वैत स्वरूप दर्शवतो. हे बीज जिथे उच्चारले जाते, तेथे शांतता, मंगलता आणि आध्यात्मिक प्रगतीचे वलय निर्माण होते.
सुजीत भोगले