मुंबई : महाराष्ट्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठेल, असा विश्वास ‘मॉर्गन स्टॅनली’ या जागतिक आर्थिक विश्लेषण संस्थेच्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या ५३६ अब्ज डॉलर जीडीपीसह भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र सिंगापूरच्या जागतिक स्तरावरील जीडीपीशी बरोबरी करीत आहे. औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, कृषी क्षेत्रातील प्रगती आणि कौशल्य विकास यांच्या बळावर महाराष्ट्र आर्थिक महासत्ता बनण्यास सज्ज आहे, असे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक क्षेत्राचा वाटा २२.५ टक्के, तर सेवा क्षेत्राचा ६४.३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात सातत्याने आघाडी घेतली आहे. धातू, वाहन, सुटे भाग, अन्न उत्पादने, पेट्रोलियम, यंत्रसामग्री आणि उपकरणे हे उद्योगांचा कणा आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये राज्याने देशातील ३९.२ टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केली, जी १९.६ अब्ज डॉलर इतकी आहे. पुणे, मुंबई आणि नाशिकमधील ऑटोमोबाईल, आयटी आणि उत्पादन उद्योगांनी उद्योगस्नेही धोरणांमुळे परदेशी आणि देशी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. वाहन आणि सुट्या भागांच्या उत्पादनात २० टक्के, औषध आणि आरोग्य उपकरणांत १६-१७ टक्के, तर कापड उत्पादनात ८-१२ टक्के वाटा असलेले महाराष्ट्र हे प्रमुख केंद्र आहे.
संशोधन अहवालातील प्रमुख निरीक्षणे
पायाभूत सुविधांचा विकास : महाराष्ट्राने रस्ते, मेट्रो, विमानतळ आणि बंदरांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्ग आणि मुंबईतील मेट्रो प्रकल्प यांसारख्या योजनांनी कनेक्टिव्हिटी सुधारली असून, व्यापार आणि उद्योगांना चालना मिळाली आहे. या पायाभूत सुविधांनी महाराष्ट्राला जागतिक व्यापार केंद्र म्हणून बळकटी दिली आहे.
डिजिटल अर्थव्यवस्थेची भरभराट : मुंबई आणि पुणे ही देशातील प्रमुख आयटी हब म्हणून उदयास आली आहेत. माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, बँकिंग, वित्त, विमा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये राज्यातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सची संख्या ७३० वर पोहोचली, जी देशातील एकूण केंद्रांपैकी ४३ टक्के आहे. डिजिटल पेमेंट्स आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या वापरामुळे महाराष्ट्र डिजिटल अर्थव्यवस्थेत आघाडीवर आहे. मॉर्गन स्टॅनलीने याला 'आर्थिक परिवर्तनाचा आधारस्तंभ' संबोधले आहे.
शेती आणि संलग्न क्षेत्रातील प्रगती : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी-प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. द्राक्ष, डाळिंब आणि संत्र्यासारख्या पिकांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. देशाच्या सरासरीपेक्षा शेतीचा जीडीपीतील वाटा कमी असला, तरी महाराष्ट्र अनेक कृषी उत्पादनांमध्ये आघाडीवर आहे.
कौशल्य विकास आणि मानव संसाधन : महाराष्ट्रातील शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांनी तरुणांना रोजगारक्षम बनवले आहे. उच्च साक्षरता दर आणि कुशल मनुष्यबळ यामुळे उद्योगांना थेट फायदा होत आहे. मॉर्गन स्टॅनलीने राज्याच्या सक्षम नेतृत्व आणि वित्तीय शिस्तीचे कौतुक केले असून, भारतातील सर्वात कमी कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर राखल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
जागतिक स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित संशोधन संस्था मॉर्गन स्टॅनलीने आपल्या नवीन अहवालात महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रातील सर्व प्रमुख निर्देशांकांवर अव्वल स्थान दिले आहे. या अहवालात महाराष्ट्राच्या धोरण आणि प्रगतीचा गौरव करण्यात आला आहे. मॉर्गन स्टॅनलीने आमच्या राज्यावर आणि नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, निर्यात, वित्तीय शिस्त, धोरण सुधारणा, ऊर्जा परिवर्तन आणि बरेच काही... जागतिक स्तरावरील २८वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठेल!
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री