
मुंबई : हर्षल पाटीलसारख्या तरुणाचा मृत्यू हा दैुर्दैवी आहे. परंतू, यानिमित्ताने युती सरकारला बदनाम करणे, फेक नॅरेटीव्ह सुरु करणे, अशी कारस्थान करणे म्हणजे मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
शासकीय कामाचे पैसे थकल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपले जीवन संपवले. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "हर्षल पाटीलसारख्या तरुणाचा मृत्यू हा दैुर्दैवीच. कोणाही तरूणावर अशी आत्महत्या करायची वेळ येऊच नये. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत. पण या निमित्ताने तातडीने महाराष्ट्रातील युती सरकारला बदनाम करायचे, फेक नॅरेटीव्ह लगेच सुरू करण्यात आले. अशी कारस्थान करणे म्हणजे मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार आहे."
"ज्या जलजीवन योजनेचा उल्लेख होत आहे त्या सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ९५४ कोटींची कामे सुरू असून ४८१ कोटींची देयके सादर झाली आहेत. त्यापैकी ४६२.७२ इतकी रक्कम तर संबंधितांना दिली गेली आहे. म्हणजे सरकार पातळीवर ना निधी देण्यास विलंब झाला ना योजना रखडल्या आहेत. विरोधकांना सरकार चुकेल तिथे टीका करायचा अधिकार आहे, पण फेक नॅरेटीवचा आधार कशाला?" असा सवालही त्यांनी केला आहे.