लखनौ : (Harshvardhan Jain Fake Embassy Case) उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मंगळवारी एसटीएफने छापा टाकून एका बोगस दूतावास चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एसटीएफने हर्षवर्धन जैन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून व्हीआयपी क्रमांक असलेल्या चार आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच विविध देशांचे आणि कंपन्यांचे ३४ सील देखील सापडले आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा सील असलेले बनावट कागदपत्रे आणि ४४.७० लाख रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
एसटीएफचे एसएसपी सुशील घुले म्हणाले, "हर्षवर्धन गाझियाबादमधील केबी ३५ कविनगर येथे भाड्याने घेतलेल्या आलिशान घरात बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक देशाचा दूतावास चालवत होता. घर भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे 'वेस्ट आर्क्टिक दूतावास' चालवत होता. तो स्वतःला वेस्ट आर्क्टिक, सबोरगा, पुलाव्विया, लोडोनिया या देशांचा राजदूत म्हणवून घेत असे. मात्र, या नावांचे कोणतेही देश नाहीत.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका आलिशान बंगल्यावर स्पेशल टास्क फोर्सच्या नोएडा युनिटने छापा टाकला. छाप्यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. एसएसपी घुले यांनी सांगितले की, हर्षवर्धन राजनैतिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करायचा. तो पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मोठ्या लोकांसोबतचे त्याचे मॉर्फ केलेले फोटो वापरून लोकांची फसवणूक करायचा. त्याचे मुख्य काम कंपन्या आणि खासगी व्यक्तींसाठी परदेशात काम करून देण्याच्या नावाखाली दलाली करणे आणि शेल कंपन्यांद्वारे हवाला रॅकेट चालवणे हे होते.
एसटीएफने सांगितले की, "चौकशीदरम्यान असे आढळून आले की हर्षवर्धन पूर्वी चंद्रास्वामी आणि अदनान खगोशी (आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेता) यांच्या संपर्कात होता. यापूर्वी २०११ मध्ये हर्षवर्धनकडून एक बेकायदेशीर सॅटेलाईट फोनही जप्त करण्यात आला होता, ज्याचा एक गुन्हा कविनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. हर्षवर्धनकडून दोन बनावट प्रेस कार्ड, दोन बनावट पॅन कार्ड, लहान देशांचे १२ राजनैतिक पासपोर्ट, अनेक देशांचे परकीय चलन, विविध कंपन्यांची कागदपत्रे आणि १८ राजनैतिक नंबर प्लेट्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
हर्षवर्धन कोण आहे?
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एसटीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हर्षवर्धन जैन यांनी गाझियाबादमधील एका खाजगी महाविद्यालयातून व्यवसाय प्रशासनात पदवी (बीबीए) केली आणि युनायटेड किंग्डममधील लंडनमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी (एमबीए) पूर्ण केली.
त्यांचे वडील जेडी जैन हे एक उद्योगपती होते. ते राजस्थानमधील बांसवाडा आणि काक्रोली येथे इंदिरा मार्बल्स आणि जेडी मार्बल्स नावाच्या खाणींचे मालक होते.
हर्षवर्धन देखील त्यांच्या वडिलांसोबत काम करायचे. या खाणींमधून मिळणारे उत्पादने लंडनलाही निर्यात केली जात होती. म्हणूनच हर्षवर्धन यांचे लंडनमध्येही चांगले संपर्क आहेत. परंतु वडिलांच्या निधनानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार , हर्षवर्धन जैन यांचे काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध होते. त्यांचे सासरे आनंद जैन हे १९७६ ते २००० पर्यंत काँग्रेस युवा शाखेचे अध्यक्ष होते आणि वादग्रस्त आध्यात्मिक सल्लागार चंद्रास्वामी त्यांना भेटायला येत असत. २००० मध्ये दोघेही लंडनमध्ये भेटले. चंद्रास्वामींनी त्यांची ओळख दुबईतील शस्त्रास्त्र विक्रेते अदनान खरबजी आणि एहसान अली सय्यद यांच्याशी करून दिली. त्यानंतर, तिघांनी मिळून लंडनमध्ये कंपन्या उघडल्या आणि फसवणूक करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर २००६ मध्ये, हर्षवर्धन त्याच्या चुलत भावासोबत राहण्यासाठी दुबईला गेले, जिथे त्याने हैदराबादच्या शफीक आणि दुबईच्या इब्राहिम अली बान शर्मा यांच्यासोबत फसव्या कंपन्या उघडल्या. येथेही तिघांनी मिळून लोकांना नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. २०११ मध्ये हर्षवर्धन भारतात परतला. त्यानंतर त्याने बनावट दूतावास उघडण्याचे काम सुरू केले. तपास यंत्रणेनुसार, प्रथम हर्षवर्धन सेबोर्गा मायक्रोनेशन नावाच्या कंपनीचा सल्लागार बनला. त्यानंतर तो पॉलबिया लोडोनिया मायक्रोनेशन आणि आता वेस्ट आर्क्टिका सारख्या बनावट देशांचा राजदूत म्हणून फिरत असे.