मुंबई : चिनी कम्युनिस्ट अधिकाऱ्यांनी तिबेट स्वायत्त प्रांतातील ड्रॅगगो काउंटी येथे असलेले ३०० हून अधिक बौद्ध स्तूप बुलडोझरने उध्वस्त केल्याचे समोर येत आहे. यात गुरु पद्मसंभव आणि खेनपो जिग्मे फुंटसोक यांच्या मूर्त्यांसह अनेक पवित्र मूर्ती पाडल्याची माहिती आहे. साधारण कारवाईची अंमलबजावणी जून महिन्यात सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. याची तुलना १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या विध्वंसाशी केली जात आहे, ज्यामध्ये हजारो मठ, धर्मग्रंथ, आणि मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. यावेळी मात्र कारवाई अत्यंत शांततेत आणि कडक सुरक्षेत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लुन्ग्राब झांग-री परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाईला सुरुवात झाली. डझनावधी भूसंपादन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांतच त्यांनी ३०० स्तूपांच्या पाडकामास सुरुवात केली. जे वर्षानुवर्षे भिक्षू आणि सामान्य भक्तांच्या श्रद्धास्थानी होते. हे स्तूप पारंपरिक हस्तकौशल्याने बांधले गेले होते.
पाडकामात पाडण्यात आलेल्या मूर्ती फक्त पाषाण किंवा धातू नव्हत्या. तर त्या श्रद्धेच्या, इतिहासाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या जिवंत प्रतीका होत्या. असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर जमीन सपाट करण्यात आली, मातीचा ढिगारा वाहून नेण्यात आला. चिनी अधिकाऱ्यांनी त्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला होता. कारवाईबद्दल कोणाशी बोलू नये म्हणून स्थानिकांनाही चेतवण्यात आले होते. त्यांना पोलीस कारवाईची धमकी देण्यात आली होती.