नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज रोवले, त्याच प्रेरणेने छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खोदली. छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्रप्रेरणा असून देशाच्या राजधानीत त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास होणे ही ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयूमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्रा’चा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासनाचे उद्घाटन झाले. यावेळी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत, तंजावरचे छत्रपती बाबाराजे भोसले आणि जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासनाचे उद्घाटन होणे ही महत्वाची घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामारिक नीतीचा अभ्यास आता होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी झुंज दिली. त्यानंतरही मराठे लढत राहिले आणि औरंगजेबाची कबर खोदली. पुढे अटकेपार झेंडा रोवला. यामागे शिवरायांच्या युद्धनीतीची प्रेरणा होती. त्यामुळे देशाच्या राजधानीत त्याचे अभ्यासकेंद्र सुरू होणे हे अभिमानास्पद आहे.
शिवरायांच्या युद्धनीतीचे कौतुक जगभरात होते. युनेस्कोने शिवरायांच्या किल्ल्याना हेरिटेज दर्जा देऊन त्यांच्या युद्धनीतीस आणि स्थापत्त्यास जागतिक स्तरावर नेण्याचा मार्ग अधिक सोपा केला आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्री असो की समुद्र, येथे त्यांनी माची पद्धत वापरून किल्ले उभारले. त्याचप्रमाणे लष्करी व नागरी व्यवस्थादेखील अशी आखली होती की शत्रूला किल्ले सहजपणे जिंकणे अशक्य होते, त्यांच्या या युद्धनीतीचा अभ्यास होणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे विलक्षण अशी दूरदृष्टी होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशावर समुद्री मार्गाने नवे संकट येईल हे शिवरायांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी अभेद्य जलदुर्ग बांधून भारताच्या पश्चिम सीमेचे रक्षण केले. त्यामुळेच इंग्रज असो की पोर्तुगीज; त्यांना शिवाजी महाराजांनी वेळीच रोखण्याची रणनीती आखली होती. शिवरायांनी प्रत्येक लढाईत कमीतकमी सैन्य वापरून शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान केले. जास्तीतजास्त नुकसान होईल अशा जागी शत्रूला ते खेचून आणून विजय मिळवत असत. ही त्यांची रणनीती अभेद्य ठरण्यामागे किल्ल्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले आहे.
भाषा हे संवादाचे मध्यम, ते विभाजनाचे मध्यम होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा, मात्र अन्य भारतीय भाषांचा आदरही करायला हवा. विवाद हा मराठी की हिंदी नसावा. भारतीय भाषांना विरोध आणि परकीय इंग्रजी पायघड्या असे योग्य नाही. स्वभाषेचा अभिमान असावाच, यासोबतच देशातील सर्व भाषांचा आदर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी ही देशातील प्राचीन भाषा असल्याचे पुरावे पुढे आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले आहे.
राजभाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यापीठात दोन्ही केंद्रे सुरू करण्यात कुलगुरूंचे योगदान महत्वाचे आहे. शासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.
जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित म्हणाल्या, जेएनयूमध्ये मराठी भाषा केंद्राचा तब्बल ७० वर्षांचा दुष्काळ राज्य सरकारने अखेर संपवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राची प्रेरणा आहे. त्यांनी अखंड भारताचे ध्येय ठेवले होते. विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा अभ्यास विद्यार्थी करणार असून सिंधुदुर्ग डायलॉग या नावाने विशेष चर्चासत्रही यापुढे आयोजित केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रविचार शिकवला - मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांनी संकुचित विचार नव्हे तर राष्ट्राचा विचार करण्याची शिकवण दिली. पानिपत लढाई ही काही मराठ्यांची नव्हती. दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना विनंती केली आणि अब्दालीचे आक्रमण मोडण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. अब्दालीने मराठ्यांशी तह करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, मराठ्यांनी देव, देश आणि धर्मासाठी तह नाकारून अब्दालीचा सामना केला. त्यामध्ये मराठ्यांचे अतोनात नुकसान झाले, मात्र शिंद्यांनी अवघ्या १० वर्षातच दिल्ली काबीज केली. म्हणूनच शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारा मराठी माणूस संकुचीत विचार करू शकत नाही. देशातील काही घटकांना छत्रपती शिवरायांच्या नावाचे ऍलर्जी आहे. मात्र हा देश काल आज आणि उद्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाईल.