भारत-इस्त्राईल संरक्षण सहकार्याला नवे बळ: लष्करप्रमुख जनरल द्विवेदी आणि इस्त्रायली संरक्षण महासंचालकांची भेट

24 Jul 2025 15:03:26

नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी इस्त्राईलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल (निवृत्त) आमीर बराम यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासह क्षेत्रातील भू-सामरिक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेद्वारे भारत-इस्त्राईल द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यावर भर देण्यात आला.

भारतीय लष्कराने या भेटीची माहिती दिली. मेजर जनरल (निवृत्त) आमीर बराम यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये क्षेत्रीय भू-सामरिक घडामोडी, संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या शक्यता आणि प्रादेशिक स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या निर्धारावर चर्चा झाली,” असे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले.

या आधी बुधवार, २३ जुलै रोजी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनीही इस्त्राईलच्या महासंचालक बराम यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण सहकार्य दीर्घकालीन दृष्टीकोनातून अधिक सखोल करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्याच्या व्यापक संस्थात्मक चौकटीचा आराखडा तयार करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतात झालेल्या संयुक्त कार्य गटाच्या बैठकीपासून सुरू असलेल्या विविध सहकार्य प्रकल्पांचा आढावाही या वेळी घेण्यात आला.

या भेटीत इस्त्राईलने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यात एका परदेशी नागरिकासह २६ जणांचा बळी गेला होता. भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन मेजर जनरल बराम यांनी दिले.

त्याचप्रमाणे भारताचे संरक्षण सचिव सिंह यांनी देखील ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्त्राईलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि सर्व बंधकांची सुटका करण्याची मागणी मांडली. भारताची 'दहशतवादास झिरो टॉलरन्स' ही भूमिका पुन्हा स्पष्ट करण्यात आली.

मेजर जनरल आमीर बराम यांचा हा दौरा भारत-इस्त्राईल संरक्षण भागीदारीसाठी अत्यंत मोलाचा ठरणारा आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण संबंधांना अधिक मजबूत आणि रणनीतिक उंचीवर नेण्याची ही एक महत्त्वपूर्ण पावले मानली जात आहेत.
Powered By Sangraha 9.0