मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "माणिकराव कोकाटे आणि माझी भेट झाली नाही. आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपण भान ठेवून बोलले पाहिजे, वागले पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या आहेत. मागेही एकदा त्यांच्याकडून अशीच गोष्ट घडून गेली. तेव्हासुद्ध मी दखल घेतली होती आणि असे होता कामा नये, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर परत दुसऱ्यांदा घडले. त्यावेळीही मी त्यांना जाणीव करुन दिली होती. इजा झालं, बिजा झालं, तिजाची वेळ आणू नका. पण आता याबाबतीत ते म्हणतात की, मी ते करतच नव्हतो. नक्की काय हे निष्पन्न होईलच."
"परंतू, सोमवारी किंवा मंगळवारी त्यांना बोलवून मी त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेईन. जर यात तथ्यता आढळली तर तो आमच्या अखत्यारीतील निर्णय असेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना कोणत्याही व्यक्तीकडून महायुतीला कमीपणा येईल, असे वक्तव्य कोणाकडूनही होता कामा नये. कुठल्याही मंत्र्याने लोकांसमोर बोलत असताना तारतम्य ठेवूनच वागले बोलले पाहिजे. याबद्दल आपण स्वत:ला काही पाळून घेणार आहोत की, नाही?" असेही ते म्हणाले.