नवी दिल्ली : (Akhilesh Yadav) दिल्लीतील संसद भवनाजवळ असलेल्या मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित राजकीय बैठक घेतल्याप्रकरणी वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा आणि उत्तराखंड वक्फ बोर्डाने या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्षेप नोंदवला आहे. मशिदीला तुम्ही राजकारणाचा मंच बनवला आहे. केवळ आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत तर राजकीय मर्यादांचेही उल्लंघन झालेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जमाल सिद्दिकी काय म्हणाले?
"संसदेजवळील मशिदीत बैठक घेऊन अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी धार्मिक मर्यादांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या मशिदीचे इमाम मोहिबुल्लाह नदवी यांनी यांना मशिदीत राजकीय बैठक घेण्यास परवानगी कशी दिली? डिंपल यादव या मशिदीत चुकीच्या पद्धतीने बसल्या होत्या" असही सिद्दिकी यांनी म्हटले आहे. तसेच या दोन्ही नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा", अशीही मागणी केली आहे.
सिद्दिकी पुढे म्हणाले की, "जर दुसरा एखादा नेता असे काही वागला असता तर त्यावरुन राजकीय वावटळ उठले असते. जे स्वतःला मुस्लिमांचा नेता समजतात ते असदुद्दीन ओवैसी झालेल्या प्रकारणाबाबत गप्प का आहेत", असाही सवाल सिद्दिकी यांनी विचारला आहे. "धार्मिक स्थळांवर राजकीय बैठका घेतल्या जाऊ नयेत यासाठी आम्ही २५ जुलैला बैठक घेणार आहोत. यामध्ये अशा प्रकारे मंदिर किवा मशिदीचा दुरुपयोग कुणीही न करण्यासंबंधीचा ठराव पास केला जाईल", असेही त्यांनी सांगितले
वक्फ बोर्डाने या प्रकरणी काय म्हटलं?
या प्रकरणात वक्फ बोर्डाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी अखिलेश यादव मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे सांगत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. "मशिद असो किंवा मंदिर ही प्रार्थना स्थळे आहेत. जी राजकीय चर्चा करण्यासाठी नाहीत तर देवाची प्रार्थना करण्यासाठी आहेत. हा काही राजकीय कुस्तीचा आखाडा नाही, पक्षाच्या खासदारांसोबत राजकीय बैठकीसाठी मशिदीचा वापर करून अखिलेश यादव यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल मुस्लिमांची माफी मागावी," असे शम्स म्हणाले.
शम्स हे सपा खासदार धर्मेंद्र यादव यांनी एक्स वर शेअर केलेल्या छायाचित्रांवर प्रतिक्रिया देत होते. या छायाचित्रात अखिलेश यादव हे त्यांच्या पत्नी डिंपल यादव, रामपूरचे पक्ष खासदार मौलाना मोहिबुल्लाह नदवी आणि संभलचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांच्यासह अनेक पक्ष खासदारांसह मशिदीत बसलेले दिसत आहेत.