मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री ते पोलिसांना शरण आले असून पहाटे त्यांना जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना छावा संघटनेच्या काही पदाधिकारी निवेदन दिले. यावेळी त्यांनी तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकले. या घनटेनंतर संतप्त होत सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजकुमार घाडगे-पाटील यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. ही घटना घडल्यानंतर पोलिस सूरज चव्हाणांच्या शोधावर होते. अखेर मंगळवार, २३ जुलै रोजी सूरज चव्हाण पोलिसांना शरण आले. मात्र, पहाटे त्यांना जामीन मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. सूरज चव्हाण यांच्यासह सर्व आरोपींना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती आहे.