एसएनडीटी महिला विद्यापीठात २०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन संपन्न!

23 Jul 2025 17:15:49



मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात पीएम उषा (PM-USHA) योजनेंतर्गत प्रस्तावित २०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन संपन्न झाले. बुधवार, २३ जुलै रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण संचलनालयाचे प्रभारी संचालक डॉ. शैलेश देवळणकर, कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "विद्यापीठाच्या प्रत्येक कॅम्पस मधून ५–६ गुणवत्तापूर्ण मुलींची निवड करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांच्यातून एलिट अ‍ॅथलिट घडवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. मुली अधिक एकाग्र आणि कर्तव्यनिष्ठ असतात. त्यामुळे त्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत. क्रीडा क्षेत्र आता एक सशक्त करिअरचा पर्याय बनला असून या क्षेत्रात रोजगार, प्रतिष्ठा आणि देशसेवा अशा सर्व संधी खुल्या आहेत. २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताने आतापासूनच तयारी सुरू करावी, यासाठी अशा दर्जेदार पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत," असे ते म्हणाले.

"पीएम-उषा योजनेअंतर्गत विद्यापीठाला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीसाठी मंत्री महोदयांनी दिलेला पाठिंबा मोलाचा ठरला. चंद्रपूर जिल्ह्यातील संस्थांनाही योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत पुढाकार घेण्यात आला, हे उल्लेखनीय आहे," असे यावेळी कुलगुरु उज्वला चक्रदेव यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?

प्रस्तावित २०० मीटरचा ६ लेनचा सिंथेटिक ट्रॅक हा विश्व अ‍ॅथलेटिक्स मान्यता प्राप्त दर्जाचा असेल. या ट्रॅकद्वारे विद्यापीठातील महिला खेळाडूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक क्षमतेत वाढ आणि दुखापतींचा धोका कमी होईल. ट्रॅकसह फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आदी बहुउद्देशीय क्रीडा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जातील.




Powered By Sangraha 9.0