झाला कौतुकाचा धनी!

23 Jul 2025 21:20:59

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा करावी लागत आहे, हा केवळ काव्यगत न्याय नव्हे, तर हा फडणवीस यांच्या सचोटीच्या आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचाच विजय म्हणावा लागेल.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त राज्यभरातून असंख्य शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचाही आवर्जून समावेश होता. वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी आपल्या विरोधकाची प्रशंसा करणे, हा लोकशाहीतील एक राजकीय उपचार. तो बहुतेकांनी पाळला. तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांनी फडणवीसांना दिलेल्या शुभेच्छा हा या नेत्यांच्या ढोंगीपणाचा कळस मानावा लागेल. ठाकरे व पवार यांनी फडणवीसांना शुभेच्छा देऊन राजकीय उपचार पाळला असला, तरी त्यांच्या या शुभेच्छा म्हणजे निव्वळ तोंडाची वाफ. लोकशाहीत आपल्या विरोधकावर टीका करणे, हा प्रत्येक नेत्याचा आणि पक्षाचा राजकीय अधिकार. पण, ही टीका वैचारिक आणि धोरणात्मक बाबींवर असते. कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका करणे लोकशाही तत्त्वांमध्ये बसत नाही. पण, सत्य हेच की याचे भान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कधी राखले नाही, हे दुर्दैव!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केवळ राजकीय टीकाच केली असे नव्हे, तर त्यांच्यावर विलक्षण कटुतापूर्ण वैयक्तिक टीप्पण्याही करण्यात आल्या. इतक्या की, मोदी हे भारतात सर्वाधिक टीका झेलणारे नेते ठरले. इतकेच काय, तर उघडपणे त्यांच्या मृत्यूची कामनाही करण्यातही विरोधकांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्याबद्दल कोणत्याही विरोधी नेत्याने आजवर कधी तोंडदेखली माफीही मागितलेली नाही. मात्र, मोदी यांनी या नेत्यांवर त्यांच्याच भाषेत टीका कधीच केली नाही. फडणवीस यांचे याबाबतीत मोदींशी साम्य म्हणावे लागेल. कारण, महाराष्ट्रातही सर्वाधिक टीका झालेले नेते हे फडणवीसच आहेत. त्यांच्यावरही मोदींप्रमाणेच वैयक्तिक आणि विकृत स्वरूपाची टीका वेळोवेळी करण्यात आली. ही टीका करण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या फुसया पक्षाचे अर्धशिक्षित नेते तसेच शरद पवार आणि त्यांचे चेलेचपाटे सर्वांत अग्रणी राहिले. फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करण्यात उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यात जणू स्पर्धा लागली होती. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर शारीरिक व्यंगात्मक टीका केल्या, तर पवारांनी फडणवीसांची प्रसंगी जातही काढली.

फडणवीस यांनीही मोदींप्रमाणेच आपल्या विरोधकांवर त्यांच्याच भाषेत टीका केली नाही. किंबहुना, आपले निर्णय आणि कृतीतून त्यांनी या विरोधकांना दणके दिले. म्हणूनच आज या विरोधी नेत्यांवर फडणवीस यांचे पाय धरण्याची वेळ आली आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हे, तर फडणवीस यांच्या निर्णयांमुळे या विरोधी नेत्यांचे राजकारणच धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची दोनदा भेट घेतली. त्याचे अधिकृत कारण काहीही असले, तरी २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर हेच उद्धव ठाकरे फडणवीस यांचा फोनही उचलीत नव्हते. त्यावरून आज उद्धव यांची काय दशा झाली आहे, ते स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महायुतीत परतण्याची ‘ऑफर’ दिली. अर्थात, हा सर्व खेळीमेळीत चाललेल्या विनोदाचा भाग होता. पण, उद्धव ठाकरे यांना त्या ‘ऑफर’मुळे मनातून गुदगुल्या नक्कीच झाल्या असतील. कारण, भाजपची साथ सोडल्याचा पश्चात्ताप त्यांना मनोमन जाळतो आहे. मात्र, त्यांनीच आपली वक्तव्ये आणि मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांनी भाजपबरोबर जाण्याचे सर्व पूल उद्ध्वस्त केले. मुख्यमंत्री झाल्यावर सत्तेच्या नशेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर वैयक्तिक टीकाप्रहार केले. सत्तेचा पुरता दुरुपयोग केला. त्याचा सर्वाधिक फटका फडणवीस यांच्या वाट्याला आला. फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक राग असल्यामुळे त्यांनी फडणवीस यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डामण्याचा कटही रचला होता. या कामी त्यांनी पोलीस यंत्रणेलाही हाताशी धरले. मात्र, काही प्रामाणिक आणि न्यायाची बूज राखणार्या नोकरशहांनी हा कट वेळीच उधळून लावला. यावरून उद्धव ठाकरे यांच्या खुनशी मानसिकतेची कल्पना येते. २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर सत्तेसाठी हपापलेल्या उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नाचविल्यावर ठाकरे यांनी तर फडणवीस यांचा फोनही उचलला नाही. आज तेच उद्धव ठाकरे फडणवीस यांची वारंवार भेट घेत आहेत आणि त्यांची प्रशंसा करीत आहेत. फडणवीस हे प्रामाणिक नेते असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसे असेल, तर बंद दाराआड (न) दिलेल्या आश्वासनाच्या भूलथापांबाबत नेमके खोटे कोण बोलत आहे, तेही ठाकरे यांनी आता सांगून टाकावे.

उद्धव ठाकरे यांनी विकृत स्वरूपाची टीका करून आपल्या असंस्कृततेचे दर्शन कित्येकदा घडविले. पण, ते काही मुरब्बी राजकीय नेते नव्हेत. त्यांना राजकारणातील खाचाखोचा तर आजही कळत नाहीत. फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करून त्यांनी आपला पोरकट स्वभाव उघड केला. मात्र, राजकारणात पाच दशके काढलेल्या आणि अनेक महत्त्वाची घटनात्मक पदे भूषविलेल्या अनुभवी शरद पवार यांनी तरी टीका करताना काही पोच दाखविण्याची गरज होती. कदाचित वाढत्या वयामुळे असेल, पण पवार यांनाही फडणवीस यांच्याबद्दलची आपल्या मनातील मळमळ बाहेर काढणे थोपविता आले नाही. त्यांनी फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख करून खरा जातीयवादी नेता कोण आहे, तेच दाखवून दिले. इतकेच नव्हे, तर जाहीर सभेत वयाला न शोभणारे हावभाव करून फडणवीस यांना हिणविले. फडणवीस यांनी मात्र याचा आपल्यावर परिणाम घडू दिला नाही आणि आपल्या लोकहिताच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले. म्हणूनच फडणवीस यांच्या कामाचा उरक बघून आपण थक्क झालो, असे पवार यांना परवा म्हणावे लागले.

फडणवीस यांनी मनावर संयम ठेवून आणि प्रगल्भ समजूतदारपणा दाखवून आपले व्यक्तिमत्त्व इतके भव्य केले आहे की, त्यांच्या पासंगालाही पुरेल, असा दुसरा नेता आज महाराष्ट्रात सापडणार नाही. म्हणूनच फडणवीस हे आज उभ्या-आडव्या महाराष्ट्रात असंख्य माणसांच्या कौतुकाचे धनी झाले आहेत! त्यांना भविष्यात महाराष्ट्राच्या हितासाठी कामे करण्यास हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0