नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांचा हा दौरा २३ ते २६ जुलै या कालावधीपर्यंत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, भारत आणि ब्रिटन यांच्यात व्यापक रणनीतिक भागीदारी आहे, ज्यात गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झाली आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवप्रवर्तन, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या अनेक क्षेत्रांत आपले सहकार्य विस्तारले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यावर चर्चा होणार आहे. या भेटीतून दोन्ही देशांत समृद्धी, विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ब्रिटन दौर्यात पंतप्रधान मोदी चार्ल्स तृतीय यांचीही भेट घेणार आहेत.
ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मालदीवला रवाना होणार असून, तेथे राष्ट्रपती महामहिम डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून मालदीवच्या स्वातंत्र्याच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होतील. याच वर्षी भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक संबंधांना ६० वर्षे पूर्ण होत आहेत.
मालदीव दौर्यात राष्ट्रपती मुइझ्झू आणि अन्य राजकीय नेतृत्वाशी बैठक होईल. याद्वारे व्यापक आर्थिक व समुद्री सुरक्षेच्या सामूहिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी तसेच हिंद महासागर क्षेत्रात शांतता, समृद्धी व स्थिरता वाढवण्यासाठी आपले सहकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल," असे पंतप्रधान म्हणाले.