उपराष्ट्रपती निवडणुकीची तयारी सुरू; लवकरच कार्यक्रम जाहीर होणार

23 Jul 2025 17:45:51

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या निवडणुकीच्या तारखा सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहीर केल्या जातील, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्रात जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची अधिकृत नोंद केली आहे. त्यानंतर, संविधानाच्या अनुच्छेद ३२४ नुसार निवडणूक आयोगाला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ तसेच त्याअंतर्गत तयार केलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ नुसार घेतली जाते, असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यात खासदारांचा (लोकसभा आणि राज्यसभा — निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य) समावेश असलेल्या निवडणूक मंडळाची यादी तयार करणे, अधिकारी व सहाय्यक अधिकारी निश्चित करणे, तसेच आजपर्यंत झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकांबाबत माहितीचे संकलन व वितरण करणे या गोष्टींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0