पाकिस्तान म्हणजे दहशतवादात बुडालेला देश ; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकला झापले

23 Jul 2025 17:02:24

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) चर्चेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत हा परिपक्व लोकशाही, उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि समावेशक समाज असलेला देश आहे, तर पाकिस्तान मात्र कट्टरवाद आणि दहशतवादात बुडालेला असून सातत्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) कर्ज मागत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी परिषदेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या विषयावर बोलताना नेहमीप्रमाणे काश्मीर मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पी. हरीश म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताची सार्वभौमत्वावर गदा आणणारा कोणताही प्रयत्न भारताला मान्य होणार नाही.

दहशतवादाविषयी बोलताना हरीश यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला चालना देताना काही मूलभूत तत्त्वांचा सन्मान होणे आवश्यक आहे, आणि त्यातील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता. परिषदेत बसलेला कोणताही सदस्य अशा वर्तनात गुंतू नये, जे आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य नाही.

शस्त्रसंधीविषयीही हरीश यांनी पाकिस्तानचा पोकळ प्रचार उघड केला. ऑपरेशन सिंदूरच्या प्रमुख उद्दिष्टांची पूर्तता झाल्यानंतरच भारताने थेट पाकिस्तानच्या विनंतीवर सैनिकी कारवाई थांबवली, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सिंधू जल कराराचा उल्लेख करत काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यावर जोरदार निषेध नोंदवताना हरीश म्हणाले की, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय शांततेबाबत पाकिस्तानचा दुहेरी दर्जा निंदनीय आहे.
Powered By Sangraha 9.0