मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूलै महिन्याचा १३ वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या ८ दिवसात जूलै महिन्याचा १३ वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
येत्या ५ ऑगस्टपर्यंत १५०० रुपये राज्यतील महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "जूलै महिन्यातील १३ व्या हफ्त्याचे ३६०० कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता डीबीटीवर पाठवलेले आहेत. लवकरच लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे मिळतील."
लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत १२ हफ्त्यांचे पैसे जमा
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअर्तंगत राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये दर महिन्याला दिले जातात. आता जुलै महिन्याच्या हफ्त्याचे पैसे हे येत्या ५ ऑगस्टपर्यंत महिलांना मिळणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत लाडक्या बहिणींना १२ हप्त्यांचे १८ हजार रुपये मिळाले आहेत.