मुंबई : कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार, २२ जुलै रोजी रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकित्सालय रुग्णालयात एक तरूणी रिसेप्शनिस्टचे काम करते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास रिसेप्शनिस्ट तरुणी रुग्णालयात कामावर कार्यरत होती. त्याचवेळी एक महिला तिच्या बाळाला घेऊन डॉक्टराकडे आली होती. परंतू, त्यावेळी डॉक्टर आले नव्हते. डॉक्टर येण्याची वाट चार ते पाच रुग्ण पाहत होते. त्याचवेळी डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले होते.
बाळाच्या उपचारासाठी आलेल्या एका महिलेसोबत गोकूळ झा हा तरूण देखील होता. तो अचानकपणे डॉक्टरांच्या केबीनमध्ये घुसू लागला. तेव्हा तरूणीने त्याला डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत जरा थांबा, असे त्याला सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या तरूण गोकूळ झा याने तरूणीला शिवीगाळ सुरू केली. त्याने तरूणीचा हात धरून बाहेर ओढले. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती.
या प्रकरणी तरूणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरूणीला मारहाण करणाऱ्या गोकूळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मंगळवारी मानपाडा पोलिस गोकूळ झा या तरुणाचा शोध घेत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनीदेखील आरोपीचा शोध सुरु केला होता. अखेर रात्री उशीरा गोकुळ झाला याला पोलिसांनी अटक केली.