मुंबई : कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा एक नवा व्हिडीओ पुढे आला असून यात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. यामध्ये त्या तरुणीने आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकित्सालय रुग्णालयात एक तरूणी रिसेप्शनिस्टचे काम करते. सोमवारी सायंकाळी आरोपी गोकुळ झा त्याच्या वहिनीसोबत रुग्णालयात गेला होता. त्यावेळी डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत जरा थांबा, असे त्या रिसेप्शनिस्ट मुलीने त्याला सांगितले.
मात्र, त्यानंतर गोकुळ झा याने संतापून त्या तरुणीला जबर मारहाण केली. मंगळवारी या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर आता या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये ती तरुणी आरोपीच्या वहिनीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. त्यामुळे या घटनेला आता नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.