“एका रात्रीत जंगल नष्ट करणे हा शाश्वत विकास नाही”; सरन्यायाधीशांनी तेलंगणा सरकारला सुनावले खडेबोल

23 Jul 2025 16:56:36

हैदराबाद(CJI BR Gavai on Kancha Gachibowli Deforestation): तेलंगणातील हैदराबाद शहराजवळील कांचा गाचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोडीच्या प्रकरणाची बुधवार दि. २३ जुलैला झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी तेलंगणा सरकारची कानउघाडणी करत म्हटले की, “एका रात्रीत बुलडोझर चालवून जंगल नष्ट करणे शाश्वत विकास ठरू शकत नाही.”

या जंगलतोडीच्या प्रकरणात तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळाने (टीएसआयआयसी) कांचा गचिबोवली वनक्षेत्रातील ४०० एकर जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी जंगलतोड करून ती जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता. काही पर्यावरणवादी संघटनानी विरोध करत तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली असता, उच्च न्यायालयाने झाडे तोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वत: हून दखल घेतल्यामुळे उच्च न्यायालयाने यावर कोणतीही सुनावणी केली नाही. अशा विकासाच्या नावावर पर्यावरणाचा ऱ्हास करणे, हे सर्वोच्च न्यायालयाला न पटल्यामुळे या प्रकरणात त्यांनी सुमोटो घेऊन तेलंगणा सरकारला खडेबोल सुनावले.

सरन्यायाधीशांनी या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त करत तेलंगणा सरकारला म्हटले की, “मी स्वतः शाश्वत विकासाचा पुरस्कर्ता आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका रात्रीत ३० बुलडोझर वापरून संपूर्ण जंगल नष्ट कराल.” या प्रकरणात न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, “त्या जागेवर ‘जैसे थे’ स्थिती स्थापित करणे ही आमची प्राथमिकता आहे.” त्याचबरोबर जंगलतोडीमुळे प्रभावित वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश राज्याच्या वन्यजीव मंडळाला दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.



Powered By Sangraha 9.0