मुंबई : राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमुर्तीं समुद्रात विसर्जन करण्याबाबत सकारात्मक भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले असून यामुळे मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दलची माहिती दिली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमुर्तीं समुद्रात विसर्जन करण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. विशेषतः मुंबईतील मानाचे आणि मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाबाबत परंपरेचा सन्मान राखत विसर्जन होईल अशी भूमिका शासनाने मांडली आहे. न्यायालयाने ही भूमिका ऐकून घेतली आहे," असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम तलावांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच!
"पर्यावरणीय समतोल लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या घरगुती आणि लहान मूर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षाहून अधिक मोठी परंपरा असून त्यामध्ये बाधा न आणता उत्सव आणि गणेशमूर्ती विसर्जन ही संपूर्ण परंपरा अखंड राहील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागृत राहून काही उपाययोजना ही केल्या जातील अशी भूमिका शासनाने घेतली आहे," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.