मुंबई : तमिळनाडू सरकारने चेन्नईतल्या किलपॉक भागातील वॅडेल्स रोडला ‘बिशप एज्रा सरगुनम रोड’ असे नाव दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. नाव बदलण्याच्या या निर्णयाबाबत द्रमुक सरकारला समाज माध्यमांवर लक्ष्य केले जात आहे. कारण एज्रा सरगुणम कायम हिंदू धर्माविरुद्ध प्रक्षोभक विधाने करण्यात अग्रेसर होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध प्रक्षोभक विधाने केल्याची आणि हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचे उघडपणे आवाहन केल्याची देखील माहिती आहे.
तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नैनर नागेंद्रन यांनी द्रमुकच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी एज्राच्या काही व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये एज्रा हिंदू धर्माविरुद्ध द्वेष पसरवताना आणि लोकांना भडकवताना स्पष्टपणे ऐकू येतेय. ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे नागेंद्रन यांनी म्हटलेय. त्यांनी तामिळनाडू सरकारकडे रस्त्याचे नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.
ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि इव्हँजेलिकल चर्च ऑफ इंडियाचे माजी प्रमुख एज्रा सरगुणम यांचे काही दिवसांपूर्वी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ते एक कट्टर ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि द्रमुकचे जवळचे मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे चर्च स्थापनेशी संबंधित अभियान सुरू करण्यात आले ज्या अंतर्गत २००५ पर्यंत देशभरात दोन हजारांहून अधिक चर्च बांधण्यात आले. त्यांच्या काळात ईवेंजेलिकल चर्च ऑफ इंडियाने २०५६ पर्यंत भारतात १,००,००० चर्च स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले होते.