जपानमध्ये नुकत्याच वरिष्ठ सभागृहाच्या झालेल्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या ‘सॅन्सेटो’ पक्षाची कामगिरी आश्चर्यकारक म्हणावी लागेल. या निवडणुकीत अवघ्या पाच वर्षांच्या या पक्षाने १४ जागा जिंकल्या. या जागेचा मुकुटमणी ज्यांच्या डोयावर आहे, त्यांचे नाव सोहेई कामिया असून, त्यांना ‘जपानचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून संबोधले जात आहे. यापूर्वी २०२२ साली झालेल्या निवडणुकीत या पक्षाला फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. खरंतर जपानच्या वरिष्ठ सभागृहात एकूण २४८ जागा आहेत. पण, यावेळी फक्त १२५ जागांवर निवडणुका लढवल्या गेल्या. सॅन्सेटोचा विजय आश्चर्यकारक यासाठी मानला जातो; कारण हा एक नवीन आणि अतिउजवा पक्ष असून, अल्पावधीतच तो अनपेक्षितरित्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
सोहेई कामिया यांनी ‘हाऊस ऑफ काऊन्सिलर्स’साठी दि. २१ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’च्या धर्तीवर ‘जपान फर्स्ट’चा नारा दिला. सोहेई यांची धोरणे राष्ट्रवाद, स्थलांतराला विरोध आणि जपानच्या सांस्कृतिक ओळखीला प्राधान्य देण्यावर केंद्रित आहेत, जी ट्रम्प यांच्या धोरणांसारखीच आहेत. त्यामुळे त्यांना ‘जपानचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणूनही संबोधले जात आहे. सोहेई कामिया यांनी स्वतः एकदा जाहीरपणे म्हटले होते की, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाडसी आणि स्पष्टवक्त्या प्रतिमेने प्रभावित आहेत व ते ट्रम्प यांना त्यांचा आदर्शही मानतात. इतकेच नाही, तर कामिया यांची नेतृत्वशैली आणि जनतेला संबोधित करण्याची पद्धतदेखील ट्रम्प यांच्यासारखीच आक्रमक आणि थेट. यंदाच्या निवडणुकीत ‘सॅन्सेटो’ने सामाजिक आणि आर्थिक दबावांमुळे संतप्त असलेल्या तरुण आणि काही जपानी मतदारांना लक्ष्य केंद्रित केले होते.
‘सॅन्सेटो’च्या स्थापनेचा प्रवास बघितला, तर २०२० साली युट्यूबवर सुरू झालेला हा पक्ष. परंतु, अवघ्या पाचच वर्षांत जपानमधील मुख्य प्रवाहाच्या राजकारणात खोलवर प्रवेश करून आणि १४ जागा जिंकून या पक्षाने एक असाधारण कामगिरी नोंदवली. हे खरं तर एका नवीन पक्षासाठी अभूतपूर्व आहे, विशेषतः जपानसारख्या देशात जिथे ‘लिबरल डेमोक्रॅटिक’ पक्षाने अनेक दशकांपासून राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी ‘एलडीपी’ आणि त्यांचा सहयोगी कोमेइतोने युतीत बहुमत गमावले. ‘एलडीपी’ला फक्त ३९ जागा मिळाल्या, पण बहुमतासाठी ५० नवीन जागांची आवश्यकता होती.
सोई कामिया यांच्याविषयी सांगायचे, तर ते यापूर्वी सुपरमार्केट मॅनेजर आणि इंग्रजी शिक्षक होते व ते आपल्या वडिलांच्या व्यवसायाशी जोडले गेले. पुढे त्यांनी कॅनडामध्ये शिक्षण घेतले आणि नंतर जपानच्या सत्ताधारी ‘एलपीडी’ पक्षात ते सहभागी झाले. मात्र, त्यांची पक्षाबाबत नाराजी होती. या कारणास्तव त्यांनी २०२० साली ‘सॅन्सेटो’ची स्थापना केली. सुरुवातीला इंटरनेटद्वारे लोकांना पक्षाशी जोडले व नंतर पक्ष हळूहळू विस्तारत गेला.
‘सॅन्सेटो’ची ही कामगिरी मात्र काही विरोधकांना चांगलीच खुपलेली दिसते. सांप्रदायिक, कट्टर विचारसरणी आणि अफवांवर आधारित प्रचार यावरून अनेक मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि विश्लेषकांनी ‘सॅन्सेटो’वर परखड टीका केली. काहींनी तर याला ‘जपानचा ट्रम्पवाद’ म्हणून उल्लेखले. जरी हा पक्ष सत्ताधारी स्थितीत नसला, तरी त्यांचा प्रभाव आता विधान प्रक्रियेवर होऊ शकतो. कारण, सध्या वरिष्ठ सभागृहात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळालेले नाही.
सोहेई कामिया हे पारंपरिक आणि समाजमाध्यमांवर आधारित लोकानुनयी राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रवाद, जागतिकीकरणाला विरोध, लोकभावनांवर आधारित प्रचार, वैद्यकीय प्रणालीवरील टीका, समाजमाध्यमांचा वापर, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर टीका याबाबत ट्रम्प आणि कामिया यांची विचारसरणी साधारण समान दिसते. जर सोहेई कामिया खरोखरच ट्रम्प यांच्यासारखी विचारसरणी राबवत असतील, तर स्थानिक मतदारांसाठी भावनिक व ‘स्वदेशी’ मुद्दे अधिक प्रभावी ठरू शकतात. मात्र, दुसर्या बाजूने विचार केला, तर जपानच्या उदारमतवादी लोकशाही रचनेला धक्का लागू शकतो, आंतरराष्ट्रीय करारांमधील सहभाग घटू शकतो, परदेशी गुंतवणूकदार व मित्रदेशांमध्ये अनिश्चितता वाढू शकते, यात शंका नाही. त्यामुळे आता पक्षाची वाटचाल कुठल्या दिशेने होते, हे पाहणे औत्सुयाचे.