बलात्काराची खोटी फिर्याद देणाऱ्या तरुणीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल!

22 Jul 2025 12:07:30

पुणे : (Pune False Rape Allegation) पुण्याच्या कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणात खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने २ जुलैला कुरियर बॉयने घरात घुसून बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती.

या तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी जवळपास ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, संबंधितांची चौकशी सुरु केली. मात्र, तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारदार तरुणीच्या घरात शिरलेला आरोपी हा कुरियर बॉय नसून तरुणीचा मित्र असल्याचे तपासातून उघड झाले. दोघांनी परस्पर संमतीने एकत्र फोटो काढले होते, हेदेखील तपासातून समोर आले.

यानंतर तरुणीने फोटोमध्ये तांत्रिक बदल करुन खोटा संदेश तयार केला. बनावट पुरावे उभे करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तरुणीने अशाप्रकारची खोटी तक्रार का केली? या तक्रारीमागचा तिचा उद्देश काय होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. येत्या काळात अशा प्रकारच्या खोट्या फिर्यादीमुळे पोलिस आणि प्रशासनाचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.




Powered By Sangraha 9.0