जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला!

    22-Jul-2025   
Total Views |

President Droupadi Murmu accepts Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली : (President Droupadi Murmu accepts Jagdeep Dhankhar's resignation) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव सोमवारी २१ जुलैला पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदपीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती यासह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो”, या आशयाची पोस्ट त्यांनी केली.

धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्याशी निगडीत कारणे आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जगदीप धनखड यांनी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर धनखड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे. प्रधानमंत्र्यांचे अमूल्य सहकार्य आणि संसद सदस्यांकडून मिळालेला स्नेह आपल्या स्मृतींमध्ये कायम राहील असे धनखड यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२२ मधे धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला होता.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी हा राजीनामा सादर केला. जगदीप धनखड यांनी तीन वर्षांपेक्षा कमी काळ काम केले. धनखड यांच्या अचानक राजीनामा देण्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, संसदेच्या आवारात तो चर्चेचा विषय झाला होता.
 

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\