मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

22 Jul 2025 22:04:23

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश.

आषाढ अमावस्येच्या दिवशी कुंचीकोरवे कैकाडी समाजात आखाडी यात्रा भव्य स्वरूपात साजरी केली जाते. ही यात्रा केवळ धार्मिक विधी किंवा परंपरा नसून, ती समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा उज्ज्वल प्रकाशस्तंभ आहे. यलम्मा-दुर्गाम्मा देवी, मरीआई आणि म्हसोबा मावलया, खंडोबा महाराज यांच्यासह समाजाच्या अनेक कुलदैवतांच्या पालख्या, पारंपरिक वाद्यांच्या गजरात वस्तीवस्तीतून निघतात. यानिमित्ताने समाजातील मान्यवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून स्नेहभोजनाचा आनंद घेतात. ही परंपरा पूर्वी डोंगरखोर्‍यांत, जंगली व दुर्गम भागांत साजरी होत होती. कारण, हा समाज पूर्वी बहुतांशी त्या भागात स्थायी होता. परंतु, कालांतराने ही जत्रा अनेक मुख्य शहरी भागांतही उत्साहात साजरी होते. यात्रेत वाजणार्‍या हलगी, डफ, ताशा, पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे आणि ‘मरीआई-म्हसोबाच्या नावं चांगभलं’, ‘यल्लू आईचा उदो-उदो’,‘दुर्गामातेचा उदो उदो’चा नाद हे सगळं पाहिलं की मन भारावून जातं. समाज आपली संस्कृती कशी जपतो आणि नव्या पिढीला त्या परंपरेशी जोडण्याचं कार्य कसं करतो, याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर येतं.

कुंचीकोरवे कैकाडी समाज हा पारंपरिक भटया जीवनशैलीतून स्थायिकतेकडे वाटचाल करणारा, विविध राज्यांत विखुरलेला व संघर्षांनी कोरलेला घटक आहे. आंध्र किंवा तामिळनाडूच्या भागांतून स्थलांतर करत त्यांनी महाराष्ट्रसह देशातल्या १४ राज्यांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या बोलीत तेलुगू व कन्नडचा ठसा स्पष्ट जाणवतो. पूर्वी या समाजाची वस्ती जंगल परिसरात होती. बलदंड शरीरयष्टी, पराक्रमी वृत्ती आणि शौर्याची परंपरा असलेल्या या समाजावर राजसत्तेने अनेक वेळा संरक्षणाचे कार्य सोपवले होते. काही वेळा सीमाभागांचे रक्षण, तर काही वेळा गुन्हेगारीचा डाग लावून अवमानितही केले गेले. पण, समाजाने कधीही आपली अस्मिता विसरली नाही. धार्मिक, सामाजिक, आणि राजकीय पातळीवर समाजाने आपला सहभाग नोंदवत लढा दिला. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात योगदान असो वा ब्रिटिश काळातील सामाजिक अन्यायाविरुद्धची लढाई असो, समाजाने स्वतःचा क्षत्रिय रक्ताचा अभिमान नेहमीच जपला. अस्पृश्यतेच्या काळातही कोणत्याही प्रकारच्या धर्मांतराचा स्वीकार न करता, हिंदू संस्कृतीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि घटनेचा स्वीकार करत सामाजिक समतेसाठी लढा दिला. कुंचीकोरवे कैकाडी समाजाची उपजीविकेची साधने फारच तोकडी होती. जंगलांमध्ये राहणारा, पशुपालन करणारा, झाडू, टोपल्या, झोके, सूप तयार करणारा हा समाज अनेक वर्षे लघुउद्योगांवर अवलंबून होता. आजही अनेक ठिकाणी अशा पारंपरिक व्यवसायांचे जतन केले गेले आहे. परंतु, कालानुरूप,समाजाने व्यवसायिक आधुनिकतेकडे वाटचाल केली आहे. आता तर स्टार्टअप आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातही या समाजातील अनेक तरुण पाय रोवत आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत असताना समाजातील अनेकांनी आपल्या पिढ्यांना उच्च शिक्षण मिळवून दिले. आज समाजातून वकील, डॉटर, इंजिनिअर, सनदी अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक यांसारख्या अनेक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटवत सामाजिक व राजकीय नेतृत्वसुद्धा घडवत आहेत. समाजाच्या प्रगतीचा पाया कुणी रचला तर तो समाजातील मातांनी. त्यांच्या हातून कष्टाचे पोते नाही सुटले, पण लेकरांच्या हातात पुस्तक मात्र आले.

कुंचीकोरवे कैकाडी समाज हा आजही पंचायती पद्धतीवर विश्वास ठेवतो. पंचायती पद्धतीतून सुसंवाद साधत समाजात अंतर्गत वाद मिटवले जातात. त्यामुळे कुटुंबात व समाजात एकतेचा आणि सहकार्याचा आदर्श उभा राहतो. विशेषतः तरुण पिढीला आपल्या संस्कृतीविषयी अभिमान वाटावा, म्हणून या समाजात बालपणापासूनच जागरूकता निर्माण केली जाते. विवाहासारख्या बाबतीत, घरातील मोठ्यांचा मान ठेवण्याची शिकवण लहान वयापासून दिली जाते. म्हणूनच या समाजात इतरत्र सर्रास दिसणारे प्रेमविवाह फारच कमी प्रमाणात दिसतात. कारण इथे ‘स्वातंत्र्य’ म्हणजे ‘जबाबदारी’ ही शिकवण आहे. कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ही आखाडी जत्रा हे केवळ एक पर्व नाही, तर समाजातील लोकांचा आत्मगौरव व्यक्त करणारी वैचारिक यात्रा आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की समाज कितीही अडथळ्यांतून गेला, तरी त्याचा आवाज हरवत नाही. तो अधिक स्पष्ट, सामर्थ्यशाली आणि आत्मभानाने परिपूर्ण होत जातो.

आजच्या धकाधकीच्या काळात, या यात्रा परंपरेच्या माध्यमातून हा समाज आपल्याला सांगत आहे की, "आपण कितीही आधुनिक जरी झालो असलो, तरीही मुळांशी नातं तोडू नका, त्यावरच तुमचं भविष्य उभं आहे.”

परंपरेत सात्त्विकतेचा भरणा

आखाडी जत्रेच्या परंपरेत आजही अनेक ठिकाणी पारंपरिक रितीप्रमाणे मांसाहाराचे सेवन विशेषतः केले जाते. ही पद्धत दीर्घकाळापासून समाजाच्या जीवनशैलीचा भाग राहिली आहे. तथापि, जत्रा संपल्यानंतर सुरू होणार्‍या चातुर्मासाच्या काळात मात्र संपूर्ण समाजातील अनेक लोक शाकाहारी जीवनशैली स्वीकारून धर्मशीलतेचा मार्ग अनुसरतात. या काळात उपवास, व्रते, येणार्‍या उत्सवांचे सात्त्विक आयोजन, पारंपरिक शुद्धता आणि आहारातील संयम यांचा विशेष सन्मान राखला जातो. पूर्वी धार्मिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे या पद्धतीचे पालन सर्वत्र शय नव्हते. पण आज समाजामध्ये आलेल्या जागृतीमुळे धार्मिक परंपरेतून आंतरिक शुद्धता असा एक सामाजिक संकल्प मानला जातो. त्यामुळे आखाडी जत्रा ही केवळ उत्सव नव्हे, तर परंपरा, परिवर्तन आणि आत्मसंयम यांचे प्रतीक बनली आहे.

परंपरेतच परिवर्तन

जत्रा ही केवळ परंपरा किंवा उत्सव नसून संघटन आणि ओळखीचं माध्यम आहे. समाज संघटित झाला, तरच न्याय आणि विकास मिळतो. त्यामुळे या परंपरेला भव्यता देणं हे सामाजिक उत्तरदायित्व आहे. या लेखाच्या माध्यमातून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने समाजाच्या सर्व विषयांना एकत्र साद घातल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
- रुपेश नारायण पवार, युवा सामाजिक कार्यकर्ते, कुंचीकोरवे कैकाडी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था

संस्कृतीरक्षक समाज

कुंचीकोरवे कैकाडी समाजाने पारंपरिक संस्कृती जपत उपेक्षिततेतही हिंदू म्हणून आपली ओळख संघर्षाने टिकवून ठेवली आहे. शासनाने त्यांच्या विकासासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, हाच या समाजाचा भावनिक आवाज शासनाने ऐकावा.
- शंकर जाधव, कार्यकारिणी सदस्य, कुंचीकोरवे कैकाडी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था

सागर देवरे
९९६७०२०३६४

Powered By Sangraha 9.0