मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी राज्य शासनाने ७२ एकर शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्ह्याच्या पशुसंवर्धन आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या अंतर्गत हे महाविद्यालय परळी येथे स्थापन केले जाईल. यासाठी मौजे लोणी (ता. परळी) येथील २२ एकर तर मौजे परळी येथील ५० एकर जमीन विनाशुल्क व महसूलमुक्त किंमतीने प्रदान करण्यात आली आहे. ग्रामपंचायत लोणी यांच्या ठरावांना तसेच जिल्हा परिषद, बीड यांच्या शिफारशीला विचारात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन वापरासंदर्भात शासनाने काही अटी व शर्ती घातल्या असून या जमिनीचा वापर केवळ पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्रासाठीच केला जाईल. जमिनीची विक्री, गहाण किंवा इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक राहील. अटींचा भंग झाल्यास किंवा भविष्यात शासनाला सार्वजनिक कामासाठी जमिनीची आवश्यकता भासल्यास, ती परत घेण्याचा अधिकार शासनाकडे सुरक्षित राहील. या प्रकल्पामुळे लगतच्या शेतकऱ्यांना किंवा खातेदारांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे बीड आणि आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय शिक्षणाची उत्तम संधी मिळेल, तसेच या भागातील पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल.