अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा! फसवणूक प्रकरणात अटकेपासून संरक्षण

21 Jul 2025 20:30:40

नवी दिल्ली(Shreyas Talpade): ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अ‍ॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.

या प्रकरणी तळपदे यांच्यावर आरोप आहे की त्यांनी ‘एचडब्ल्यूसी’ या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सहभाग घेतला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना संस्थेच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले गेले. तळपदे यांच्यावर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये ‘भारतीय दंड संहिता(IPC)’ च्या कलम ४०९ नुसार विश्वासघात करणे, कलम ४२० नुसार फसवणूक करणे, ४१९ नुसार खोटी प्रतिमा सादर करणे हे गुन्हे नोंदवले होते. तसेच हरियाणामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNNS), २०२३ चे कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत तळपदे यांच्यावर गुन्हा नोंदविला गेला होता.

या सर्व आरोपप्रकरणात झालेल्या एफआयआरच्या विरोधात तळपदे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटक होण्यापासून संरक्षण मागितले आहे. या सर्व एफआयआर एकत्र करून हस्तांतरित कराव्यात, अशी मागणी त्यांनी खंडपीठासमोर केली होती. या प्रकरणी खंडपीठाने संबंधित राज्य सरकारांना नोटीस बजावली असून, तळपदे यांच्याविरोधात कोणतेही सक्त कारवाईचे पाऊल उचलू नये, असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावरची पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.



Powered By Sangraha 9.0