मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

21 Jul 2025 13:45:40

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईसाठी पुढील काही दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. सोमवारपासून गुरुवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक, रेल्वे आणि विमानसेवा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर वाढणार

आयएमडीच्या मते, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये पाऊस अधिक तीव्र होईल. काही भागांमध्ये वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो. पावसाची तीव्रता पाहता पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारी सकाळपासूनच अनेक भागांत पाणी साचलेले दिसते आहे. लोअर परळ, दादर, कुर्ला, सायन या ठिकाणी वाहतूक मंदावली. लोकल ट्रेन वेळेवर धावत आहेत, मात्र पावसाचा जोर वाढल्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी फक्त गरजेच्या कारणासाठीच प्रवास करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळावर काही उड्डाणं उशिराने होत आहेत. पावसामुळे रनवेवर दृश्य मर्यादा कमी झाली आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना पूर्व सूचना घेऊनच प्रवास करण्यास सांगितले आहे. शहरातील काही भागांत पाऊस वाढल्यास शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पालकांना शाळांच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी शक्यतो बाहेर पडू नये, विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, वाहने सावधपणे चालवावी, सरकारी सूचनांकडे लक्ष द्यावे आणि त्या सूचनांचे पालन करावे.

महानगरपालिकेची तयारी

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सतर्कतेचा इशारा दिला आहे. ड्रेनेज साफसफाई, वाहतूक नियोजन, आणि आपत्ती व्यवस्थापन यावर भर दिला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे महानगरपालिकेने म्हटले आहे. आयएमडी नुसार, पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. समुद्रातील भरतीमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून किनारपट्टीवरील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे सांगण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0