नागपूर : कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन कुठलीही मागणी पूर्ण होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहारणीच्या घटनेवर ते बोलत होते. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राज्यात कुठल्याही संघटनेने रस्त्यावरची लढाई लढू नये. वैचारिक लढाई ही वैचारिक पद्धतीने लढली पाहिजे. काही वेळा आंदोलनाचा पवित्रा घेता येतो. पण मारपीट करणे, वाद तयार होणे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारून काय सिद्ध होणार? त्यामुळे राज्य विकासाकडे चालले असताना यापद्धतीचे तंटे योग्य नाही. राज्याला विकासाकडे नेण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. आपसातील राडे करून महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचे काम कुणीही करू नये. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे राडे करून कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन कुठलीही मागणी पूर्ण होऊ शकत नाही. आंदोलनाच्या भूमिका ठरल्या पाहिजे. त्या मारपीटीच्या नसून वैचारिक पद्धतीच्या असल्या पाहिजे," असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विरोधकांनी पुरावे द्यावे!
हनी ट्रॅपबद्दल बोलताना ते म्हणाले की, "संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले माध्यमांसमोर पुरावे का देत नाहीत? जनतेला संभ्रमित ठेवणे आणि स्वत:चा टीआरपी वाढवणे हेच त्यांचे काम आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी द्यावे. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी हनी ट्रॅप पुढे आणावा. तसे काही असते तर एका सेकंदात त्यांनी जनतेसमोर आणले असते. ते थांबणारे लोक नाहीत. केवळ गिरीश महाजन यांना टार्गेट करणे योग्य नाही. ते एक जबाबदार नेते आहे. एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर आरोप करणे ठीक नाही. राजकीय नेत्यांनी कुणाला बदनाम करण्याचे षडयंत्र करू नये," असेही ते म्हणाले.