छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीतून सूरज चव्हाणांची हकालपट्टी! अजित पवारांनी दिले राजीनामा देण्याचे आदेश

21 Jul 2025 14:02:00

Ajit Pawar and Suraj Chavan


मुंबई : लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना देत त्यांना चांगलाच दणका दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे," असे ते म्हणाले.
"सामाजिक जीवनात काम करत असताना..."; लातूरमधील घटनेनंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

नेमकं काय घडलं?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना छावा संघटनेच्या काही पदाधिकारी निवेदन दिले. यावेळी त्यांनी तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकले. या घनटेनंतर संतप्त होत सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजकुमार घाडगे-पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

Powered By Sangraha 9.0