खानिवडे, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची चिखल मातीत असलेली नाळ त्यांच्या चिखलातील वावरण्याने अधिक घट्ट विणली गेली.त्यांनी मोठ्यांना शेतकामात मदत करताना येथेच्छ चिखलात माखून लागवडीचा मनसोक्त आनंद उपभोगला.
पांडुरंग शास्त्री आठवले (प. पू. दादाजी) हे एक महान तत्वज्ञ, समाजसुधारक आणि अध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी स्थापन केलेल्या स्वाध्यायामुळे भारतीय समाजात विशेषतः ग्रामीण आणि तळागाळात मोठा सकारात्मक बदल घडवून आणला.
स्व-अध्याय" म्हणजेच स्वतःचा अभ्यास. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी भगवद्गीतेतुन एक अनोखा समाजिक व आध्यात्मिक चळवळ उभारली ती म्हणजे स्वाध्याय.भक्ती,ज्ञान आणि कर्म यांना आत्मिक साधनेशी जोडणारा योग म्हणजेच स्वाध्याय.माझ्या हृदयात जसा भगवंत वास करतो तसा तो दुसऱ्याच्या हृदयात सुद्धा वास करतो.त्यामुळे आपण सर्वांना एकसमान पाहिले पाहिजे.यासारख्या सुसंस्कृत समाजरचनेच्या शिकवणीतून अनेक क्रियाशील प्रयोग त्यांनी सुरू केले.यामध्ये . योगेश्वर कृषी - सामुहिक शेती, जी "भगवंतासाठी" केली जाते.वृक्ष मंडळ - झाडांची पूजा करून त्या परिसरात भक्ती आणि सुसंवाद साधला जातो.मातृ मंडळ, युथ फोरम, बालसंस्कार वर्ग -समाजात सर्व वयोगटांना धर्म, सेवा आणि एकतेची शिकवण . भावफेरी करून भक्त आपल्या भागातील स्वाध्याय कुटुंबांना भेट देतात व आध्यात्मिक स्नेह वाढवतात.तसेच मत्स्यगंधा सारखे अनेक अनोखे प्रयोग त्यांनी दिले.ज्यातून भारतीय संस्कृतीची खरी ओळख निर्माण होण्यास साहाय्य होत आहे .यातीलच एक अध्यात्मिक सामाजिक प्रयोग म्हणजे योगेश्वर भावकृषी आहे.भावकृषी म्हणजे फक्त भौतिक शेती नाही, तर आत्मिक "भाव" - श्रद्धा व भक्ती यांची शेती. लोकांना आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उन्नत करणे हा याचा मुख्य हेतू असून स्वाध्यायी' सदस्यांच्या श्रमभक्तीवर आधारित ही शेती आहे.
"योगेश्वर भावकृषी” ही एक अभिनव साधना आहे ज्यात आध्यात्मिकतेतून प्राप्त ऊर्जा समाजसेवा व कृषी साधनेत गुंफली जाते. या माध्यमातून भगवंताच्या उपासनेशी जोडलेले कार्य, समाजातील एकात्मता, वच्चिता आणि परोपकाराची भावना वाढवण्यास मदत होते.