हैदराबाद रेल्वे ट्रॅक व्हिडियो प्रकरणी ‘एक्स’ची उच्च न्यायालयात धाव! केंद्र सरकारला पाठवली नोटीस!

02 Jul 2025 19:54:12

बंगळुरू(Hyderabad railway track video case): हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.

एलॅान मस्क यांच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ‘एक्स कॉर्प इंडिया’ ही भारतातील उपकंपनी आहे. न्यायालयात या कंपनीची बाजू मांडणारे वकील के. जी. राघवन यांनी २६ जून रोजी प्राप्त झालेल्या नोटीशीचा उल्लेख करत ती तर्कहीन
असल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या युक्तीवादात म्हटले की, “काही महिलांनी रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवली आणि तो व्हिडिओ आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला. त्यात आमचा काय दोष, आज भारतात कितीतरी काँन्टेट बेकायदेशीरपणे चालत आहे?” अशा प्रकारे एक्स कॉर्प इंडिया कंपनी स्वतःला आणि आपल्या वापरकर्त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. भारत सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कंपनीच्या वकीलाची कानउघाडणी करत म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय संस्थांना असा अहंकार नसावा, रेल्वे विभागाला याबाबत कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

‘एक्स कॉर्प इंडिया’ने न्यायालयात याचिकेत सांगितले की, “माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम ७९(३)(ब) अंतर्गत सरकारला कोणतीही माहिती हटविण्याचा थेट अधिकार नाही. असा आदेश केवळ आयटी कायदा, कलम ६९अ आणि संबंधित नियमांचे पालन करूनच दिला जाऊ शकतो. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, "कलम ६९अ व्यतिरिक्त इतर कुठल्याही आधारावर जर माहिती हटवण्याचे आदेश दिले गेले, तर ते बेकायदेशीर ठरावेत.” त्यामुळे विविध मंत्रालयांनी अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईपासून दूर रहावे, अशी मागणी एक्सने केली आहे.

न्यायालयाने ‘एक्स कॉर्प इंडिया’ला याचिकेत सुधारणा करण्याची आणि भारत सरकारच्या विविध मंत्रालयांना प्रतिवादी करण्याची परवानगी दिली. तसेच केंद्र सरकारला या याचिकेवर उत्तर द्यायचे आदेश दिले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.



Powered By Sangraha 9.0