“कोकणच्या मातीतून उगमलेली ‘दशावतार’ची थरारक गाथा – दिलीप प्रभावळकर पुन्हा नव्या रूपात!”

02 Jul 2025 19:51:17

मुंबई : देवभूमी कोकणच्या लाल मातीतील निसर्ग, लोककला, रूढी-परंपरा आणि संस्कृतीला पडद्यावर जिवंत करत, एक गूढ आणि थरारक अशी कथा रसिकांसमोर साकारली जात आहे – ‘दशावतार’.

झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता दिलीप प्रभावळकर. ‘चिमणराव’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘तात्या विंचू’, ‘चिंची चेटकीण’ यांसारख्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले प्रभावळकर आता वयोमानाच्या टप्प्यावरही नव्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहेत.

या नव्या भूमिकेचा अवतार म्हणजे ‘दशावतार’ – कोकणात घडणाऱ्या एका रहस्यमय आणि सस्पेन्स थ्रिलर कथानकावर आधारलेला चित्रपट. कोकणच्या अद्भुत सौंदर्यात गुंफलेली आणि दशावतार या लोककलेच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली ही कथा प्रेक्षकांना थरार, गूढता आणि उत्कंठेचा नवा अनुभव देणार आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. निर्मात्यांच्या भक्कम टीममध्ये सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांचा समावेश आहे.

चित्रपटाची कलानिर्मिती अजित भुरे यांनी केली असून, कोकणातील निसर्ग, लोककला आणि संस्कृती या पार्श्वभूमीवर गुंफलेली ही थरारक कथा १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याची पहिली झलक लवकरच झी मराठीवर प्रसारित होणार असून, दशावतारच्या या भव्य गूढतेकडे आता संपूर्ण रसिकवर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Powered By Sangraha 9.0