नवी दिल्ली(Kahaani 2 Film and Copyright): प्रसिद्ध पटकथा लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 'कॉपीराइट कायदा, १९५७' अंतर्गत घोष यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असता, सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकारी यांच्या समोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासूनही सूट देत घोष यांना दिलासा दिला आहे.
तक्रारदार उमेश प्रसाद मेहता यांनी झारखंडच्या हजारीबाग येथील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करत असा आरोप केला की, सुजॉय घोष दिग्दर्शित आणि विद्या बालन अभिनीत ‘कहानी २’ या चित्रपटाच्या कथेने त्यांच्या ‘सबक’ नावाच्या पटकथेच्या कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे.मेहतांच्या मते, त्यांनी जून २०१५ मध्ये ‘सबक’ ही पटकथा घोष यांच्याकडे दिली होती, जेणेकरून ती चित्रपट निर्मात्यांसमोर सादर करता येईल. मात्र डिसेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहानी २’ मध्ये त्यांच्या कथानकाचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात सुजॉय घोष यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की “नोव्हेंबर २०१२ मध्येच ‘कहानी २’ची पटकथा लिहायला सुरुवात केली होती. तसेच डिसेंबर २०१३ मध्ये ती स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये नोंदवण्यातही आली होती. पुढे तक्रारदाराशी कोणताही संपर्क किंवा त्याची पटकथा घेण्याचा आरोप घोष यांनी नाकारला आहे.
“हजारीबाग दंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही पटकथांची तुलना न करता तक्रारीवर थेट समन्स जारी केला होता, जो प्रक्रिया कायद्याच्या विरोधात आहे. यात झारखंड उच्च न्यायालयाने आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर न करता दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला”, अशा प्रकारे घोष यांच्या वकीलांनी युक्तिवाद केला.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने झारखंड राज्य आणि तक्रारदार उमेश प्रसाद मेहता यांना नोटीस बजावली. तसेच, घोष यांना दंडाधिकाऱ्यांपुढे वैयक्तिक हजेरीपासून सूट देत फौजदारी खटल्यातून अंतरिम दिलासा दिला.