तारीख ठरली! तब्बल दोन वर्षानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा
02 Jul 2025 14:22:12
नवी दिल्ली(Shiv Sena Dispute): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
उबाठा गटाचे वकील कामत यांनी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या अगोदर न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी विनंती न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर केली होती. एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयासमोर असे नमुद केले की, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ७ मे रोजी याच उल्लेखावर तातडीने सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती. वकील कामत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशांप्रमाणेच याही प्रकरणात तात्पुरता दिलासा देण्याची विनंती केली.
वकील कामत यांच्या सुनावणीच्या आग्रहाला न्या. सुंदरेश यांनी विचारले की "एवढ्या तातडीच्या सुनावणीची गरज का आहे?" तेव्हा कामत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणूकीच्या पार्श्वभूमीवर नमुद केले की, हा लोकांच्या निवडीच्या अधिकाराशी (The people right of choice) संबंधित मुद्दा आहे. कामत यांच्या या युक्तिवादामुळे न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी १४ जुलै रोजी पासून करण्यास सहमती दर्शवली.
काय आहे राष्ट्रवादीचे प्रकरण? राष्ट्रवादीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाला अधिकृत चिन्हाचा वापर हा न्यायालयीन प्रकरण आहे, अशा प्रकारची जाहिरात वर्तमान पत्रात देण्याची सूचना केली होती. त्यानंतर २४ तासाच्या आत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आली होती.