आमची कोल्हापुरी चप्पल जगात भारी!

    02-Jul-2025
Total Views |

कोल्हापूर
: कोल्हापूरी चप्पल म्हणजे भारतीय ब्रँड. सांस्कृतिक आणि एतिहासीक वारसाहीही. आकर्षक, टिकाऊ आणि आरोग्यदायी असणारी कोल्हापुरी चप्पल जगभरात देश-विदेशात विकली जाते. स्थानिक भाषेत या पादत्राणांना पायतान म्हणून संबोधले जाते. मात्र नुकतेच इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड ‘प्रादा’ने कोल्हापुरी चप्पलसारखे पादत्राण यंदाच्या फॅशन महोत्सवात वापरले.या प्रकरणामुळे देशभरात वादचर्चा सुरू झाली

भारतीय कलाकुसरीवर आक्रमण झाले असे पडसासद उमटू लागले.त्यानंतर प्रादाने सारसवासारव करत म्हंटले की त्यांनी शोमध्ये सादर केलेली चप्पल ही कोल्हापुरी चपलेची प्रेरणा घेऊनच बनवली होती. त्यानंतर कोल्हापूर चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली. या घटनेबद्दल समाजमनाचा मागोवा इथे घेतला आहे.

कोल्हापुरी चपलांचे पेटंट घेण्यासाठी एकवटणार

इटलीची प्रसिद्ध कपंनी प्रादा यांनी ेमहाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांची मिलानमधील मेन्स२०२६ स्प्रिंग समर शोमध्ये दाखवली. आमच्या समाजात यामुळे संतापाची लाट उसळली आहे. कारण कोल्हापूर चप्पल हे आमचे बॅ्रंड आहे.आमचे उत्पादन आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर कळाले आहे की ‘कोल्हापुरी चपलांना भारत सरकारने जीआय मानांकन दिले आहे. आता पर्यंत वाटत होते की जीआय मानांकन मिळाले की बस. पण या घटनेने कळले की जीआय मानाकंनासोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चप्पल उत्पादनांचे पेटंट घेण्याची आवश्यकता आहे. सरकार आणि संबधित यंत्रणा याबाबत काय ते करतीलच पण समाज म्हणून आम्हीही यासाठी सहकार्य करणार आहेात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट मिळाल्यावर कौशल्य असलेल्या समाजाच्या व्यवसायाला पुन्हा तेजी येईल.
रवी पेवेकर
विश्वस्त-रोहिदास समाज पंचायत संघ

प्रादावर कारवाई होणे आवश्यक

इटलीची प्रसिद्ध कंपनी प्राडा यांनी कोल्हापुरी चपलेचे नक्कल चोरून फॅशन शो मध्ये प्रसिद्धी मिळवली खरंतर प्रादा कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे. जसे एखाद्या प्रसिद्ध कंपनीचे डुबलीकेट प्रोडक्ट बनवल्यास त्यांच्यावर कॉपीराईट ची केस होते मग अशा प्रसिद्ध कंपन्यांनी कोल्हापुरी चपलेचे कॉपी करणे गुन्हा नाही का? आता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरने रीतसर तक्रार केली. त्यानंतर प्रादा ग्रुपचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी संबंधित सँडलची भारतीय प्रेरणा असल्याचे नमूद केले. पण ही सुदधा चोरीच आहे. यासंदर्भातली दखल तात्काळ भारत सरकार सह सबंधित यंत्रणानी घ्यायला हवी
धनंजय वायंगणकर. 
अध्यक्ष वसुधा चॅरीटेबल ट्रस्ट

कोल्हापूरी चपलेला जगभरात मार्केट मिळणार असेल तर!

एक उद्योजक म्हणून मला वाटते की इतर कोणत्याही बॅ्रंडच्या चपला पर्स्ट कॉपी म्हणून विकली तर तात्काळ कायदेशिर कारवाई होते. प्रादाने तर त्याच्या शोमध्ये कोल्हापुरी चप्पल समाविष्ट केली. ही घटना लक्षात आल्यावर कोल्हापुरी चपलेबाबत जागतिक पटलावर चर्चा सुरू झाली. आपल्या कोल्हापुरी चपलेच्या बॅ्रंडची भूरळ विदेशातल्या प्रतिष्ठीत कपंनीला पडली. कोल्हापुरी चप्पल काय आहे याबाबत जगभरात उत्सुकता वाढली. या क्षेत्रातला व्यावसायीक म्हणून मला वाटते की ही कोल्हापुरी चप्पल बनवणार्‍या किंवा या व्यवसायात असलेल्या सगळ्यांना एक संधी आहे. प्रादामार्पत विदेशात कोल्हापुरी चपलांना कायेदशिररीत्या मार्केटिंग मिळत असेल तर प्रादाने भारत सरकारच्या माध्यमातून अटीशर्तीनुसार महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल बनवणार्‍या उद्योजक व्यावसायिकांन त्यात समाविष्ट करावे.
भूपेंद्र गडकरी
पाऊल पुटवेअर, दादर