नरेंद्र मोदींचे घानामध्ये स्वागत!; पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्यावर

02 Jul 2025 22:32:28

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठवडाभर आंतरराष्ट्रिय दौऱ्यावर आहेत. घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत. हा दौरा भारताचा आफ्रिकेशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दौरा आहे. २ ते ९ जुलै २०२५ हा दौरा चालणार आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी घानाच्या अक्रा विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी G7 शिखर परिषदेत आपली उपस्थिती दाखवली. २ ते ९ जुलै २०२५ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट देणार आहेत. या दौरा दरम्यान पंतप्रधान विविध द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान हे जागतिक नेत्यांशी संवाद साधण्यास आणि विविध गोष्टींवर चर्चा करण्यास उत्सुक आहेत,असे पंतप्रधानांनी त्यांच्या (X) अकाउंटच्या पोस्टमध्ये सांगितले.

घानाच्या अक्रा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी केले. घानामध्ये हा पंतप्रधानांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे.‘’आमचे देश दीर्घकालीन संबंध मजबूत करण्यासाठी आणि सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत’’ असे पंतप्रधान म्हणाले.

घानाच्या भेटीनंतर, पंतप्रधान मोदी हे ३ आणि ४ जुलै रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट देणार आहेत, त्यानंतर ते अर्जेंटिनाला भेट देतील. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचा मुकाम नामिबिया असेल, जिथे ते ८ फेब्रुवारी रोजी निधन झालेल्या नामिबियाच्या वसाहतवादविरोधी प्रतीक सॅम नुजोमा यांना श्रद्धांजली वाहतील. ब्राझील आणि भारत यांच्यातील संरक्षण सहकार्यावर चर्चा ५-८ जुलै दरम्यान होण्याची अपेक्षा आहे, जेव्हा पंतप्रधान मोदी रिओ डी जानेरो आणि ब्राझिलियाला भेट देतील.

नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी जाहीर केले की ब्राझीलच्या भेटीदरम्यान, दोन्ही बाजूंनी संरक्षण उत्पादन आणि सहकार्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे, कारण ब्राझीलने अधिक सुरक्षित दळणवळणासाठी तंत्रज्ञान आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरल्या जाणाऱ्या भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये रस दाखवला आहे.



Powered By Sangraha 9.0