मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था आहे. तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुका-जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत का? की तकलादू छोटे-छोटे उपचार करणार आहोत, असा प्रश्न आ. प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला. त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक उत्तर दिले.
विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांनी राज्य परिवहन महामंडळाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर म्हणाले की, मी ही एका एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे. माझे वडील एसटी कंडक्टर होते. एसटी कर्मचाऱ्यांची मानसिकता मला जवळून माहित आहे. त्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था आहे. त्यांच्या संवेदना समजून घेण्याची गरज आहे. तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी असतात. तालुका-जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत का? की तकलादू छोटे-छोटे उपचार करणार आहोत. अशा प्रकारची व्यवस्था तालुका-जिल्हा स्तरावर रुग्णालयांत आहे का? नसेल तर शासन कोणती उपाययोजना करणार?, असा सवाल दरेकरांनी केला.
दरेकरांच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि योग्य ते उपचार मिळण्यासाठी विभागवार होणाऱ्या निविदा प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे कर्मचाऱ्यांची चांगली चाचणी घेण्यासाठी उपाययोजना महामंडळामार्फत केली जाईल.