माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

    02-Jul-2025   
Total Views |

मुंबई : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला असून, कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीचे आणि पक्षाने दाखविलेल्या विश्वासाचे मनापासून आभार मानले आहेत.

बावनकुळे यांनी आपल्या पत्रात कविवर्य ना.धो.महानोर यांच्या ओळींचा उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी ३५ वर्षांपूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, सायकल किंवा पायी गावोगाव फिरणे यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला. "सामान्यमधल्या असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे," असे ते म्हणाले.

१२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना आनंदासोबतच जबाबदारीचे दडपण जाणवले. उत्तमरावजी पाटील, गोपीनाथरावजी मुंडे, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस यांसारख्या दिग्गजांनी भूषविलेल्या या पदाला त्यांनी 'शिवधनुष्य' संबोधले. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दीड कोटी सदस्यसंख्या गाठून राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला, असे त्यांनी नमूद केले आहे.

निवडणुकीतील यश-अपयश आणि शिकवण

- बावनकुळे यांच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने काही काळ निराशा आली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने चुकांमधून शिकत विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. "आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा-महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या यशाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना आहे," असे त्यांनी नमूद केले.

- बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. आता राज्याचे महसूल मंत्री म्हणूनही त्यांना ही संधी मिळत आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीमुळे हे शिवधनुष्य पेलता आल्याचे त्यांनी सांगितले.

- पत्राच्या शेवटी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि अनवधानाने काही चुका झाल्यास त्याबद्दल माफी मागितली. "राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः" या ब्रीदवाक्याला उराशी बाळगून आपण आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.