नवी दिल्ली : (Covid Vaccine) कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक वाढलेल्या मृत्यूंबाबत आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या विस्तृत अभ्यासाचा हवाला देत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरूणांमध्ये हृदयविकारामुळे वाढत चाललेल्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, कोरोनावरील लसीकरण आणि तरूणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण यात कोणताही संबंध नाही. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात जीवनशैली आणि आधीच्या आजारांना मृत्यूसाठी कारणीभूत ठरविण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, "अचानक झालेल्या मृत्यूप्रकरणांची देशातील अनेक संस्थांद्वारे चौकशी करण्यात आली आहे आणि त्यांच्या अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, कोविड-१९ लसीकरण आणि अचानक झालेल्या मृत्यूंच्या अहवालांमध्ये थेट संबंध नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील कोविड-१९ लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत, ज्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत", असे त्यात म्हटले आहे.
"अचानक कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, जसे की, अनुवांशिकता, बदललेली जीवनशैली, आधीपासूनच असलेले आजार आणि कोरोनानंतर आरोग्याशी संबंधित निर्माण झालेल्या समस्या. कोविड लसीकरणाचा अचानक होणाऱ्या मृत्यूशी संबंध जोडणारी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत, या दाव्याना वैज्ञानिक आधार नाही" असेही निवेदनात म्हटले आहे.