हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी! महिला आणि बालकल्याण समितीचा अहवाल सादर, काय म्हटलंय अहवालात?

19 Jul 2025 12:51:08


पुणे : (Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला बाल हक्क अणि कल्याण समितीने याप्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची शिफारस समितीने या अहवालातून केली आहे.

नेमकं काय म्हटलंय अहवालात?

वैष्णवी हगवणे प्रकरणात प्रथमदर्शनी जरी ही आत्महत्या वाटत असली तरी तरी ही पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचे प्रकरण आहे. तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीला सहआरोपी करुन त्या दोघांचीही चौकशी करावी, सुपेकर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करावा, असे महिला बालकल्याणच्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वीच मयुरी हगवणे प्रकरणाची जर योग्य वेळी दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती. त्यामुळे मयुरी हगवणेची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच वैष्णवीच्या बाळाचा ताबा तिच्या आई-वडिलांकडेच ठेवावा, असेही या अहवालात म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0