मुंबई : "जनजाती समाज हा भारताच्या शाश्वत परंपरेचा आधारस्तंभ आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी व संस्कृतीच्या जतनासाठी हा समाज नेहमीच आघाडीवर राहिला आहे", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. वसंत महिला महाविद्यालय, वाराणसी येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्याशी संबंधित राष्ट्रीय चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी जनजाती समाजाला भारताचा मूळ समाज म्हणून वर्णन केले.
उपस्थितांना संबोधत योगी आदित्यनाथ म्हणाले, "जनजाती समाजाने नेहमीच भारताचा वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपण अनेकदा देशाच्या सध्याच्या स्वातंत्र्याकडे राष्ट्रीय चळवळ म्हणून पाहतो, परंतु जनजाती समाजाने प्रत्येक युगात सनातन धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी लहानपणीच धरती मातेचा आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा संदेश दिला, जो आजही प्रेरणादायी आहे."
जनजाती समाज सनातन परंपरेचा खरा प्रतिनिधी असल्याचे वर्णन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "हा समाज आपल्या जीवनात वेदांच्या शिकवणींचे पालन करतो. आपण झाडे आणि नद्यांची पूजा करतो, पण त्यांना तोडण्यास किंवा त्यांच्यावर कब्जा करण्यास मागेपुढे पाहत नाही. परंतु जनजाती समाजाने निसर्गाशी सुसंगत राहून वेदांच्या शिकवणींचे पालन केले आहे. जेव्हा भगवान राम वनवासात होते आणि माता सीतेचे अपहरण झाले तेव्हा अयोध्या किंवा जनकपूरमध्ये त्यांच्याकडे सैन्य नव्हते. त्यावेळी जनजाती समाज त्यांच्यात सामील झाला आणि रावणाविरुद्ध लढला. त्याचप्रमाणे, महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या जंगलात भटकंती केली, जनजाती समाजाच्या मदतीने आपल्या सैन्याची पुनर्रचना केली आणि अकबराशी लढा दिला."