नवी दिल्ली : (Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्काळ आणि दीर्घकालीन मदत करणे, हे या ट्रस्टच्या उद्दिष्ट आहे.
टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने मुंबईमध्ये सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या ट्रस्टला प्रत्येकी २५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. टाटा सन्सने याबाबत शुक्रवारी एक निवेदन जारी करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. "ट्रस्ट मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे थेट किंवा आनुषंगिकरित्या प्रभावित झालेल्या इतर सर्वांना तात्काळ आणि दीर्घकालीन मदत करेल," असे टाटा सन्सने निवेदनात म्हटले आहे. तसेच "अपघातानंतर प्रथम प्रतिसाद देणारे, वैद्यकीय कर्मचारी, आपत्ती निवारण व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करेल", असे सांगितले आहे.
पाच सदस्यांचे विश्वस्त मंडळ या ट्रस्टचे व्यवस्थापन सांभाळतील. टाटा कंपनीचे माजी अनुभवी वरिष्ठ एस. पद्मनाभन, टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि इतर तीन विश्वस्तांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे म्हटले आहे. ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये मृतांना १ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान, गंभीर जखमींना वैद्यकीय उपचार आणि अपघातात नुकसान झालेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी मदत यांचा समावेश आहे.
निवेदनानुसार, कर अधिकाऱ्यांकडे आवश्यक नोंदणी आणि सध्या सुरू असलेल्या इतर कामकाजाच्या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ट्रस्टला निधी दिला जाईल आणि ते पूर्ण प्रामाणिकपणे त्यांचे काम सुरू करेल,” असे निवेदनात म्हटले आहे.