नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्यावर हिंदू धार्मिक संस्थेत नोकरी करूनही ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याचा आरोप असून ते देवस्थानच्या संस्थात्मक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
टीटीडी प्रशासनाने सांगितले की, दक्षता अहवाल आणि अंतर्गत चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांनी हिंदू धार्मिक संस्थेत काम करताना अपेक्षित धार्मिक आचरण पाळले नाही, असे ट्रस्टचे म्हणणे आहे. टी
टीडीच्या म्हणण्यानुसार, ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांशी संबंधित माहिती दक्षता विभागाच्या अहवालातून आणि इतर कागदपत्रांमधून समोर आली. त्यानंतर, नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करून सर्वांना निलंबित करण्यात आले. हिंदू धार्मिक संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या परंपरा आणि मूल्यांनुसार वागणे अपेक्षित आहे. शिस्त आणि विश्वासार्हता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीटीडीच्या सध्याच्या नियमांनुसार, केवळ हिंदू धर्माचे पालन करणारे लोकच संस्थेत नोकरीसाठी पात्र आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना हिंदू धर्म आणि मंदिर परंपरांचा आदर करणे आवश्यक आहे. टीटीडी बोर्डाचे म्हणणे आहे की ते बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या इतर विभागात स्थानांतरित करण्यासाठी किंवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) देण्याच्या दिशेनेही काम करत आहेत.
यांचे झाले निलंबन
१. बी. एलिझार - उपकार्यकारी अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)
२. एस. रॉसी - स्टाफ नर्स, बीआयआरडी हॉस्पिटल
३. एम. प्रेमावती - ग्रेड-१ फार्मासिस्ट, बीआयआरडी हॉस्पिटल
४. डॉ. जी. असुंता - एसव्ही आयुर्वेदिक फार्मसी