ठाकरे ब्रँड जिवंत आहे पण आता बाजारात चालत नाही! सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

    19-Jul-2025
Total Views |


मुंबई : ठाकरे ब्रँड जिवंत आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही, असा खोचक टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, १९ जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "ठाकरे ब्रँड जिवंत आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड आहेत पण, प्रत्येक ब्रँड चालतो असे नाही. सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि मतदारांना पसंत येत नाही. ब्रँड असेल त्याबद्दल वाद नाही," असे ते म्हणाले.


"उद्धव ठाकरे स्वत:ला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झाले आहेत. पण बाकी सामान्य जनता आमच्यासोबत आहे. मतदानातून ईव्हीएम मशीनचे बटण दाबून त्यांनी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे हे सांगितले आहे. राजकारणाचा आता डायनासोर, जादूटोणा इथपर्यंत गेला आहे. जादूटोणा करून जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असती, देशातला जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा नावाची गोष्ट जगात नाही. जादूटोणा करता आला असता तर भारत हा जगातील सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता. आपल्याला गुलामगिरीची साडे सातशे वर्षे भोगावी लागली नसती. जादूटोणा ही कपोलकल्पित कथा आहे," असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही. मराठीच्या संदर्भात अभिजात भाषेचा दर्जा या सरकारनेच दिला, तो काँग्रेसने कदापि दिला नव्हता. १९५६ मध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना जबरदस्तीने पाठवण्याचे काम काँग्रेसने केले," असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.