मित्रासोबत कार रेसिंगच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोन जणांना चिरडले

19 Jul 2025 19:19:25
 
police-officers-son-crushes-two-people-while-racing-with-friend
 
 
गांधीनगर : गुजरातच्या भावनगर भागात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने बेदरकारपणे वाहन चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत कार रेस लावण्याच्या नादात त्याने पादचारी आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दोन मृत्यू तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हर्षराज गोहिल (वय २०), असे आरोपीचे नाव असून तो बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, घटनेतील मुख्य आरोपी हर्षराज पांढऱ्या रंगाचे वाहन चालवत होता. तर त्याचा मित्र लाल रंगाची कार चालवत त्याच्या मागे येत होता. हर्षराज आणि त्याच्या मित्राने कालियाबीड परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर कार रेस लावायचे ठरवले.
 
हर्षराजचे वाहन १२०-१५० किमी प्रतितास वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून हर्षराज चालवत असलेली कार दोन पादचाऱ्यांना धडकून बाईकस्वाराला धडकताना दिसत आहे. अपघातग्रस्तांना सर टी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू यातील दोन जणांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
हर्षराज हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले एएसआय अनिरुद्ध गोहिल यांचा मुलगा आहे. मुलाने केलेल्या माहिती मिळताच एएसआय गोहिल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला चोप देत निलमबाग पोलिस ठाण्यात सोपवले.
 
 
Powered By Sangraha 9.0