मुंबई : (Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज तिवारी?
मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारताच ते म्हणाले, "या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकता आहे, जी भाषिक एकता आहे, बंधुता आहे, ती तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यामुळे त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावे. पण त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होणार नाही अशी मी प्रार्थना करतो."
जे राज ठाकरेंसोबत जातील ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून नष्ट होतील - मनोज तिवारी
पुढे ते म्हणाले, "यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करत नाही आणि जे राज ठाकरेंसोबत जातील ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून नष्ट होतील. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषाच्या अस्मितेचे पालन योग्य पद्धतीने करत आहे. त्यांच्या इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा आदर करु शकत नाही. पण हे लोक तर मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत. ज्यामध्ये राज ठाकरे देखील आहेत", असे मनोज तिवारी यांनी म्हटले. आता राज ठाकरे मनोज तिवारी यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.